अहमदनगर। नगर सहयाद्री
मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी ७५ टक्के शास्तीमाफी जाहीर करूनही प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने मोठ्या थकबाकीदारांवर कारवाईचे नियोजन सुरू केले आहे.
५ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेले २८४ थकबाकीदार मनपाच्या रडारवर असून, त्यांच्याकडे ६१.७२ कोटींची थकबाकी आहे. त्यांच्यावर जप्ती कारवाई सुरू करण्याचे आदेश उपायुक्त सचिन बांगर यांनी मंगळवारी बैठकीत दिले. २८४ पैकी न्यायालयीन दावे प्रलंबित असलेले थकबाकीदार वगळून इतरांची नावे संकेतस्थळावर व प्रभागात फलकांवर प्रसिद्ध केली जाणार आहेत.
महापालिकेच्या कराची थकबाकी २४८ कोटी आहे. चालू वर्षात ४५ कोटींचा कर जमा झाला आहे. अद्याप २०५ कोटींची थकबाकी आहे. प्रशासनाने १ लाख ते ५ लाख व पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्यांची यादी तयार केली आहे. एक ते ५ लाख थकबाकी असलेले २४५० थकबाकीदार असून त्यांच्याकडे ४७.१९ कोटींची थकबाकी आहे.
पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेले २८४ थकबाकीदार असून, त्यांच्याकडे ६१.७२ कोटी थकीत आहेत. पहिल्या टप्प्यात २८४ पैकी न्यायालयीन दावे वगळून इतरांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यांच्यावर जप्ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे उपायुक्त बांगर यांनी सांगितले.