मुंबई | नगर सह्याद्री:-
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारमधील कृषीमंत्री आणि अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकोटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप होती.
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्या सदनिका आहेत त्या घोटाळ्यासंदर्भात हा दावा दाखल करण्यात आला होता. नाशिक जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिला असली तरी कोकोटे यांनी जामीन मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र कोकाटे यांची आमदारकीही धोक्यात येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
माणिकराव कोकाटेंना जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यावर आता ते हायकोर्टात अपील करू शकतात. जर या निर्णयाला स्टे मिळाला तर काही अडचण नाही, परंतु स्टे नाही मिळाला तर त्यांच्या सदस्यत्त्वाला धोका निर्माण होऊ शकतो. माणिकराव कोकाटे यांच्यावर 420 कलमांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजितदादांचा दुसरा शिलेदार अडचणीत!
अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. धनंजय मुंडेंविरोधात शिंदे सरकारमध्ये कृषीमंत्री असताना घोटाळा केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यासोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच आता दादा गटाचे आमदार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दणका दिला आहे. माणिकराव कोकाटे जामिनासाठी अर्ज दाखल करू शकतात. हे प्रकरण कोकाटेंच्या अंगलट येतं की काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.