मुंबई / नगर सह्याद्री –
महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवार देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अद्याप एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही. तसेच मंत्रिमंडळाबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही.
यावेळी अनोखी बाब म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे नेते म्हणून अजित पवार यांच्या नावावर नवा विक्रम नोंदवला जाणार आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री करण्याची राज्यघटनेत तरतूद नाही. मात्र राजकीय समीकरण सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षांना सरकारमधील क्रमांक दोनचा संदेश देण्यासाठी मध्यममार्ग सापडतो आणि कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या ज्येष्ठ नेत्याकडे हे पद सोपवले जाते.
शरद पवार यांच्या विरोधात बंड केल्यानंतर अजित पवार हे 2023 पासून महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. यापूर्वी 2019 मध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती आणि 72 तासांच्या एनडीए सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. नंतर त्यांनी एनडीएचा पाठिंबा काढून घेतला आणि महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले.
मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती
एवढेच नाही तर अजित पवार यांनी उघडपणे मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आहे. मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण उपमुख्यमंत्र्यांवरच गाडी अडकली तर काय करायचे, असे अजित म्हणाले होते. सध्या तरी अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदाची समीकरणे ठरलेली नसून गुरुवारी ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (नोव्हेंबर 2010-सप्टेंबर 2012, ऑक्टोबर 2012-सप्टेंबर 2014) यांच्या कार्यकाळात अजित पवार यांनी दोनदा उपमुख्यमंत्रीपद भूषवले आहे. 2019 मध्ये एनडीए सरकारमध्ये ते तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर त्यांनी सकाळीच राजभवनात जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली. मात्र, हे सरकार केवळ 72 तासच अस्तित्वात होते.
त्यानंतर त्यांनी चौथ्यांदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारची शपथ घेतली. अजित डिसेंबर 2019 ते जून 2022 पर्यंत उपमुख्यमंत्री राहिले. त्यानंतर जुलै 2023 मध्ये अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. ते शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले होते.
आता अजित पवार आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होणार आहेत. फडणवीस सरकारमध्ये ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री होणार आहेत.
…पण मी तर शपथ घेणार – अजित पवार
महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात अजित पवार पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. बुधवारी राजभवनावरील पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला की, तुम्ही आणि अजितदादा उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहात का? त्यावर संध्याकाळपर्यंत धीर धरा, सगळं काही समजेल असं शिंदेंनी उत्तर दिले त्याचवेळी अजित पवारांनी संध्याकाळपर्यंत त्यांचे काय ते समजेल पण मी उद्या शपथ घेणार आहे. अजितदादांच्या या उत्तरावर पत्रकार परिषदेत हशा पिकला.
त्यावर शिंदेंनीही दादांना सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी शपथ घेण्याचा अनुभव असल्याचा टोला लगावला. पुन्हा दादांनी मागे आम्ही काही दिवसांसाठी आलो आता ५ वर्ष कायम राहणार आहे असं उत्तर दिले. सध्या त्यांचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.