मार्चच्या पहिल्या आठवड्यात आमदार लंके देणार ‘घड्याळा’ला सोडचिठ्ठी! खा. कोल्हे यांच्या महानाट्याचा मुहूर्त | दिलीप वळसे पाटलांनाही मिळणार झटका
सारिपाट / शिवाजी शिर्के
सोबत असलेला एकही आमदार आपल्याला सोडून जाऊ शकत नाही, अशी वल्गना आणि त्याच भ्रमात राज्यात पक्ष संघटना वाढविण्यासाठी सरसावलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पहिली धोबीपछाड त्यांनाच समर्थन देणार्या पारनेरच्या आ. नीलेश लंके यांच्याकडून मिळणार आहे. अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जाणार आहे. विश्वासू सहकारी समजल्या जाणार्या आ. लंके यांच्यासाठी नगरची लोकसभा उमेदवारी देण्याचा निर्णय दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच घेतला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात खा. अमोल कोल्हे यांच्या महानाट्याचा प्रयोग नगरमध्ये आयोजित करण्यात आला असून त्या महानाट्याच्या माध्यमातून स्वत:च्या प्रचाराचा आणि शेजारील शिरुर लोकसभा मतदारसंघाचे पवार गटाचे उमेदवार खा. अमोल कोल्हे यांच्याही प्रचाराचा नारळ वाढविला जाणार आहे. कोल्हे यांच्यासाठी ही जमेची बाजू असताना दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. राजकारणात मुरब्बी आणि दादा समजल्या जाणार्या अजित पवार यांना लंके यांच्यासारख्या नवख्या आमदाराने दिलेली ही धोबीपछाड अजित पवार यांना चांगलीच जिव्हारी बसणार असून त्याचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटल्यास आश्चर्य वाटू नये!
राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगाचा आणि त्यापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांचा निकाल आला. दोन्ही निकाल शरद पवार यांच्या विरोधात गेले. अजित पवार यांचे राज्यातील सर्व समर्थक आणि खासदार-आमदार हे संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा करत असताना त्याच अजित पवार यांचे विश्वासू समजले जाणारे पारनेरचे आमदार लंके यांच्या मनातील घालमेल लपून राहिली नाही. मतदारसंघातील परंतु पनवेल-कामोठे परिसरात वास्तव्यास असणार्या पारनेरकरांचा मेळावा आणि त्या मेळाव्यात आ. लंके यांनी केलेले वक्तव्य बरेच काही सांगून गेले. लोकसभा लढणारच असे ठणकावून सांगणार्या आ. लंके यांनी त्याच मेळाव्यात कार्यकर्त्यांना तयारीला लागा, असा आदेशच दिला.
दोन दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्षांचा निकाल आला आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह अजित पवार यांचेच असल्याचा निर्वाळा या निकालातून देण्यात आला. दरम्यान, संगमनेर येथे महाविकास आघाडीतील प्रमुख राजकीय पक्ष समजल्या जाणार्या काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या महानाट्याचा प्रयोग आयोजित करण्यात आला. या महानाट्यात अमोल कोल्हे यांनी महानाट्याचे सादरीकरण करतानाच आ. थोरात यांच्यासाठी केलेली राजकीय बॅटींग बरीच बोलकी ठरली. याहीपेक्षा बोलक्या ठरल्या त्या आ. थोरात यांनी अमोल कोल्हे यांना लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या शुभेच्छा! आ. थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघाला लागूनच खा. अमोल कोल्हे यांचा लोकसभा मतदारसंघ येतो. या मतदारसंघातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातील काही गावे थेट आ. थोरात यांच्या संपर्कातील आहेत.
संगमनेर मुक्कामी जे घडलं तेच आता नगर मुक्कामी महानाट्याच्या निमित्ताने घडत आहे. हा योगायोग नक्कीच नाही! सारे काही अगदी ठरवून चालू आहे. तिकडे संगमनेर-जुन्नर या बांधभाऊ मतदारसंघाच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून अजित पवार यांची नाकाबंदी करतानाच दिलीप वळसे पाटील यांच्या नाकपुड्या दाबण्याचा कार्यक्रम शरद पवार यांनी राबवला. आता तोच कार्यक्रम नगरमधील महानाट्याच्या माध्यमातून होणार आहे. अर्थातच यासाठी पडद्याआड शरद पवार यांची भूमिका आहेच! नगर लोकसभेची जागा ताब्यात घेण्याचं शरद पवार यांचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न! तुकाराम गडाख यांच्या माध्यमातून ते फक्त एकदाच पूर्ण झाले. मात्र, त्यानंतर आजपर्यंत पवारांनी अनेक प्रयोग करुनही ते शक्य झाले नाही.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आणि आता पक्षाची संपूर्ण सुत्रे अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर चवताळून उठलेल्या शरद पवार यांनी जंग-जंग पछाडण्यास प्रारंभ केला आहे. नगरमध्ये खा. कोल्हे यांचं महानाट्य म्हणजे शरद पवार यांना व्यासपीठ मिळवून देण्यासारखाच प्रकार! अमोल कोल्हे यांना नगरमध्ये आणून त्यांचा महानाट्याचा प्रयोग आयोजित करुन नीलेश लंके यांना त्यांच्या प्रचाराचा नारळच वाढवायचा आहे. पारनेरच्या शेजारी असणार्या शिरुर मतदारसंघात याचे पडसाद उमटणारच! म्हणजेच त्यातून अजित पवार यांच्या वळचणीला गेलेल्या दिलीप वळसे पाटील यांचीही गोची होणार हे सर्वश्रूत!
नगरची जागा शरद पवार गटाकडे गेल्याचे महाविकास आघाडीने जाहीर केले असताना व आचारसंहिता लागू होण्यास दहा-बारा दिवसांचा कालावधी बाकी असतानाही शरद पवार गटाकडून ना उमेदवार जाहीर झाला ना त्यासाठीची चाचपणी झाली. दुसरीकडे अजित पवार गटातील नीलेश लंके यांनी लोकसभा लढणार आणि विखेंना पराभूत करणार, अशा वल्गना दिल्या! दोन्ही पवारांपैकी कोणीही लंके हे त्यांचे उमेदवार असणार की नसणार याबाबत काहीच भाष्य केले नाही. यातच बरेच काही सामावले आहे.
संपूर्ण राज्यात अजित पवार यांच्या विरोधात रान पेटविण्यास शरद पवार सज्ज झालेत आणि तितक्याच ताकदीने शरद पवार यांना थोपविण्यास अजित पवार सज्ज झाल्याचे दिसत असताना नगरमध्ये भलतंच घडत आहे. अजित पवार यांच्यासोबत गेेलेले कोणीच गळाला लागत नसताना लंके हे शरद पवार यांच्या गळाला लागले आहेत. याचाच अर्थ पारनेरच्या लंके यांनी अजित पवार यांच्या कथीत दादागीरीला कोणतीही भिक न घालता धोबीपछाड देण्याचा निर्णय घेतल्यात जमा आहे. लंके हे कायम धाडसी निर्णय घेण्यात माहीर आहेत. प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा विस्थापित कार्यकर्ता, अशी ओळख निर्माण झालेल्या लंके यांनी मोठे धाडस करत अजित पवार यांना धोबीपछाड देण्याचा घेतलेला निर्णय त्यामुळेच कौतुकाचा विषय ठरला आहे.