Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगत आहेत, कारण पुण्यात भरलेल्या ४३ व्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनात काही धक्कादायक राजकीय भाकितं वर्तवण्यात आली आहेत. या संमेलनात सहभागी झालेल्या एका ज्योतिषांनी स्पष्टपणे सांगितले की, अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, तर उद्धव ठाकरे यांना हलक्यात घेऊ नये, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे. या ज्योतिष संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यासह देशातील अनेक नेत्यांच्या भविष्यावर भाष्य करण्यात आलं. विशेषतः अजित पवार यांच्याविषयी दिलेलं भाकीत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अजित पवार यांची पत्रिका संघर्षमय आहे, मात्र त्यांनी केलेल्या लढ्यामुळेच त्यांना पुढे जाऊन मुख्यमंत्रिपद प्राप्त होईल, असं ज्योतिषांनी सांगितलं.
ज्योतिषांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबतही महत्त्वाचे भाकीत वर्तवले. सद्यस्थिती त्यांच्या विरोधात असली तरी उद्धव ठाकरेंना हलक्यात घेणे योग्य ठरणार नाही. त्यांचे राजकीय अस्तित्व टिकून राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची पत्रिका ‘अत्यंत मजबूत’ असल्याचे सांगत ज्योतिषांनी भाकित वर्तवलं की, मोदी सध्या संपूर्ण भारतावर प्रभाव टाकत आहेत. मात्र, काही वर्षांनंतर ते राजकारण सोडून अध्यात्माकडे वळतील. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत, “ते ‘लंबी रेस का घोडा’ आहेत. त्यांची दिल्लीकडे वाटचाल सुरू आहे आणि ते मोठ्या पदावर विराजमान होतील,असंही सांगण्यात आलं.
राजकीय भविष्य सांगणाऱ्या या ज्योतिष संमेलनात, जेव्हा पुण्यातील वाहतूक कोंडी कधी सुटणार असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा उपस्थित ज्योतिष काहीसे गोंधळले आणि यावर उत्तर देऊ शकले नाहीत. पुण्यात भरलेल्या या दोन दिवसीय संमेलनाला ५०० हून अधिक लोकांची उपस्थिती होती. तरुणाईपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या भाकितांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा रंग भरला असून, अजित पवार मुख्यमंत्री होणार का, आणि उद्धव ठाकरे राजकीय पुनरागमन करणार का? यावर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.