बारामती / नगर सह्याद्री –
राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत देखील बारामती मतदारसंघ चर्चेत आहे. या निवडणुकीत बारामतीत काका-पुतण्याची लढाई पाहायला मिळतेय. युगेंद्र पवार विरूद्ध अजित पवार अशी लढत बारामतीत होत आहे. दोन्ही पक्षांकडून अतिशय जोरदार प्रचार सभा पार पडल्या होत्या. बारामतीकर कोणाला कौल देतात? याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीएमपदाचा चेहरा याच्याबाबत मोठं वक्तव्य केलंय. ते म्हणाले आहेत की, जो आमदार निवडून येईल ते ठरवतील मुख्यमंत्री कोण होणार? दरम्यान अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय.
जय पवार म्हणाले की, बारामतीकरांनी चांगला प्रतिसाद दिलंय. बारामतीकर एक कुटुंब म्हणून प्रतिसाद देत आहेत. विकास आणि भावना दोन्ही विचार बारामतीकरांच्या मनात आहेत. लोकसभेत विचार साहेबांच्या बाजूने होते. विधानसभेत मात्र दादांच्या बाजूने आहेत. बारामतीकरांचा कालच्या सभेत प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यावरून दिसत आहे. आमच्याकडे देखील कारवाया केल्या गेलेल्या आहेत, असं जय पवार म्हणाले आहेत.
जय पवार म्हणाले की, अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावं, असं नक्कीच वाटतं. कालच्या सभेत देखील प्रचंड प्रतिसाद लोकांचा होता. तर अजित पवार यांनी मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, असं जाहीर केलं होतं. आज राज्यात सगळीकडे मतदान होत आहे. त्यामुळे आता बारामतीकर नेमकं कोणाची साथ देतात? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.