मुंबई । नगर सहयाद्री:
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका पोलीस अधिकारी महिलेला फोनवरून तंबी दिली. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर चर्चेत आला. महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा आणि अजित पवारांच्या व्हिडिओ कॉलची क्लीप व्हायरल झाल्यानंतर नेत्यांनी पवारांवर टीका केली. या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून थेट सुनावलं आहे.
’अजित पवारांना नैतिकदृष्ट्या सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेला माणूस आयपीएस अधिकाऱ्याला बेकायदेशीर कामांना पाठिंबा देण्यास सांगत आहे. अजित पवार इतरांना कायदा शिकवता, मग तुम्ही काय करताय? तुम्ही सगळे चोरांचे सरदार आहात’, अशी थेट टीका राऊतांनी केली.
पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. शिंदे, अजित पवार यांच्याकडेच माणसं चोर, डाकू, स्मगलर, बलात्कारी आहेत. अशी टीका राऊतांनी महायुतीच्या मंत्र्यांवर केली. ’शिंदे, अजित पवार यांच्याकडे माणसं चोर, डाकू अन् स्मगलर बलात्कारी आहेत. त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी या नेत्यांना सत्ता हवी आहे.’
’आमदार सुनील शेळकेंचं प्रकरण मी बाहेर काढलं. बेकायदेशीर खाणकाम सुरू होतं. त्यांनी सरकारला कोट्यावधींचा चुना लावला. अजित पवार त्यांना संरक्षण देतात. मोदींनीही अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला आहे. आता ते आयपीएस अधिकाऱ्याला दम देतायेत. ते फार शिस्तबद्ध आहेत का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
’मी बेशिस्त खपवून घेणार नाही, असं ते म्हणतात. मग आता काय झालं? एका आयपीएस अधिकारी महिलेला तुम्ही दम देताय? तेही तुमच्या पक्षातील चोरट्यांना संरक्षण देण्यासाठी? ’ असा थेट सवाल राऊतांनी उपस्थित केला.