मुंबई / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडानंतर दोन गट पडले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान नुकतेच अजित पवार यांनी शरद पवारांना १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांच्याविरोधात केलेल्या बंडाची आठवण करून देत टोला लगावला. परंतु माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी याबाबत भाष्य करत अजित पवारांचा खरपूस समाचार घेतलाय.
जरंडेश्वर कारखान्याच्या प्रकरणात माझा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या प्रभावाखाली काम करणाऱ्या ईडीवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे या प्रकरणात मी आता हायकोर्टात याचिका करणार असून अजित पवारांना सश्रम कारावास देण्यात यावा, अशी मागणी करणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असले तरी ते पुढील चार महिन्यांत तुरुंगात जातील असा हल्लाबोल शालिनी पाटील यांनी केला आहे.
आगामी मुख्यमंत्री फडणवीस असतील
शालिनी पाटील यांनी राजकीय भाष्य देखील केले आहे. त्या म्हणाल्यात की, अजित पवार तर तुरुंगात जातील, त्यामुळे ते मुख्यमंत्री होणार नाहीत. एकनाथ शिंदेही पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. कारण त्यांना शेतकऱ्यांसह इतर प्रश्न सोडवण्यात अपयश आलं आहे. देवेंद्र फडणवीस हे पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात. कारण त्यांनी त्यांच्या पक्षाचा विश्वासघात केला नाही असं शालिनी पाटील यांनी वक्तव्य केले आहे.