Maharashtra News: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. एकीकडे नेते मंडळी निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. बाजार समितीतील घोटाळा प्रकरणी १५ दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अधिक माहिती अशी: बीडच्या पाटोदा बाजार समितीच्या मालकीचा भूखंड, बेकायदेशीर रित्या दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रामकृष्ण बांगर यांना वाशिम येथून अटक करण्यात आली आहे. १५ दिवसांपूर्वी पाटोदा पोलिस ठाण्यात रामकृष्ण बांगर यांच्याविरोधात या गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिस त्यांच्या शोधात होते. अखेर त्यांना पोलिसांना अटक केली.
रामकृष्ण बांगर यांच्यावर बाजार समितीच्या भूखंड प्रकरणाबरोबरच महात्मा फुले अर्बन बँकेच्या माध्यमातून १४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. रामकृष्ण बांगर यांच्यासह तब्बल ४१ जणांवर हा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून रामकृष्ण बांगर हे फरार होते. त्यांच्या मागावर असलेल्या पथकाने वाशीम येथील एका हॉटेलमधून त्यांना अटक केली असून चौकशी सुरु आहे.