Politics News : कोपरगाव मतदारसंघातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होवू नये यासाठी आमदार आशुतोष काळेनी पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेवरून गोदावरी उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे.
गोदावरी कालव्यांना पावसाळ्यात सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव मतदारसंघातील उजव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व पाणी पुरवठा योजनांचे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात आले होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती. परंतु साठवण तलाव भरून बराच कालावधी होत असल्यामुळे काही गावातील साठवण तलावात थोड्याच दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक होता.
त्यामुळे उजव्या कालव्याला वेळेत पाणी सोडले नाही तर पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता ओळखून नागरीकांना पिण्याच्या पाण्याची अडचण येवू नये यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला उजव्या कालव्याला पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या.
पाणी सोडण्याच्या सूचना करतांना त्यांनी पाटबंधारे विभागाला गोदावरी नदीत सुरू असलेल्या ओव्हर-फ्लोच्या पाण्यातून उजव्या कालव्याला पाणी सोडण्यास सांगितले होते. तसेच सोडण्यात येणाऱ्या ओव्हर-फ्लोच्या पाण्याचा कोणत्याही आवर्तनात हिशोब धरू नये व गोदावरी नदीत सोडण्यात येत असलेले ओव्हर-फ्लोचे पाणी सोडावे अशा सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार उजव्या कालव्याला पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ज्या गावातील पाणी पुरवठा योजनांच्या साठवण तलावातील पाणी साठा कमी झाला होता त्या गावातील नागरीकांना मोठा दिलासा मिळाला असून या गावातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.



