पारनेर | नगर सह्याद्री:-
राज्यात विधानसभा निवडणुकींचे बिगूल वाजले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. अशातच अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित पारनेर विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाने माजी सभापती काशिनाथ दाते यांना उमेदारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची ४ उमेदवारांची तिसरी यादी रविवारी (दि. २७) दुपारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहे.
नुकताच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, माजी बांधकाम सभापती काशिनाथ दाते, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, धनगर समाजाचे नेते शिवाजीराव गुजर यांनी आपल्या समर्थकांसह जाहीरपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे महायुतीकडून पारनेर मतदार संघात राजकारण बदलणार असल्याची चर्चा होती. तसेच लोकसभेत नीलेश लंके यांनी बाजी मारल्यानंतर या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार तोडीस तोड देण्याबाबत खल सुरू होता.
उमेदवारीची माळ कुणाचा गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता लागली होती. अखेर लागलेली उत्सुकता संपली संपली असून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार राणीताई लंके यांच्या विरोधात महायुती कडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी सभापती काशिनाथ दाते यांना उमेदारी जाहीर केली आहे. दरम्यान, उमेदवारी नाकारलेले सुजित झावरे व माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, समर्थक काय भूमिका घेतात यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर
फलटण – सचिन पाटील
गेवराई – विजयसिंह पंडित
निफाड- दिलील बनकर
पारनेर – नकाशिनाथ दाते