अहमदनगर । नगर सहयाद्री:-
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आता सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. येत्या १६ ऑगस्ट २०२४ पासून सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत.
तसेच जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येत्या २८ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलनामुुळे लाडकी बहिण योजना, पीक विमा अर्ज यासह गावातील विविध कामे ठप्प होणार आहे.
अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंचांना १५ हजार, उपसरपंचाना १० हजार, तर सदस्याला तीन हजार मानधन मिळावे, या प्रमुख मागणीसाठी सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचार्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांकडे याबद्दल वारंवार पाठपुरावा केला जात आहे.
मात्र तरीही आमच्या अनेक मागण्यांवर दुर्लक्ष होत आहे. यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले. तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी संकटमोचक होऊन आमच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
अनेक कामे होणार ठप्प
या आंदोलनामुळे लाडकी बहिण योजना, पीक विमा अर्ज, शैक्षणिक कागदपत्रे, दाखले मिळणार नाहीत. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या योजनांचे काम होणार नाही. त्यासोबतच या आंदोलनामुळे गावातील अनेक कामे ठप्प होणार आहेत.