अहमदनगर। नगर सहयाद्री
पैशाच्या वादातून सिद्धार्थनगरच्या बौद्ध वस्तीत दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांनी शनिवारी (दि. २३) परस्पर विरोधी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रामा विनायक भालेराव (वय ४० रा. सिद्धार्थनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश कांबळे, शुभम आदमने व गणेश कांबळे याचा साडू आकाश (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामा भालेराव शुक्रवारी सायंकाळी घरी असताना त्यांच्या घरासमोर गणेश कांबळे याच्यासह तिघे आले. त्यांनी रामा भालेराव व एका अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करून लाकडी दांडयाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गणेश राजू कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलगा (वय १७), काळू घोरपडे व रामा भालेराव (सर्व रा. सिद्धार्थर्थनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गणेश कांबळे यांनी एक वर्षापूर्वी अल्पवयीन मुलाला तीन हजार रूपये उसणे दिले होते. वेळोवेळी पैसे मागितले असता त्याने पैसे दिले नाही. शुक्रवारी रात्री त्याने कांबळे यांना फोन करून घरी बोलून घेतले. अल्पवयीन मुलगा, घोरपडे व भालेराव यांनी पैसे मागतो म्हणून गणेश यांना लाथाबुक्क्यांनी व कुर्हाडीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.