spot_img
अहमदनगरAhmednagar Politics : मविआत उमेदवारांची जत्रा; महायुतीत सावधपणा!

Ahmednagar Politics : मविआत उमेदवारांची जत्रा; महायुतीत सावधपणा!

spot_img

मतदारसंघ पुनर्रचनेआधीची शेवटची विधानसभा | महिनाभरापूर्वी खुंटा बळकट केलेल्यांची ताकद पणाला लागणार
सारीपाट / शिवाजी शिर्के –
लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्याच्या आकडेमोडीत गुंतलेले आता बहुतांशजण विधानसभेसाठीची गणिते मांड लागले आहेत. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होण्याची शक्यता आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात दोन्ही बाजूकडून आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. दोन्ही बाजूने काही उमेदवार अंतिम असले तरी काही ठिकाणी बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपा- सेना या महायुतीला नरेटीव्ह म्हणजेच खोट्या कथनकाचा मोठा फटका बसल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार जिल्ह्यात विजयी झाल्याने त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुवर्रचना झाल्यानंतर त्याची मुदत आता पुढच्या वर्षात संपत आहे. म्हणजेच आता होणारी ही निवडणूक शेवटची असणार! चार-पाच वर्षानंतर येणारी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका या नव्याने पुनर्रचना जाहीर होणार्‍या मतदारसंघानुसार असणार आहेत. लोकसभेत दोन जिंकल्याने महाविकास आघाडीत उत्साह जसा आहे तशीच उमेदवारांची जत्रा देखील आहे. दुसरीकडे सपाटून मार खालेल्या महायुतीतील भाजपा- सेना- राष्ट्रवादीतील संभाव्य उमेदवारांनी सावधगिरी बाळगण्यास आतापासूनच प्रारंभ केल्याचे दिसते. विशषेत: भाजपाच्या चिन्हावर लढावे की नाही इथपासूनच काहींच्या समर्थकांनी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकूणच प्राप्त परिस्थितीत नगरमधील बारा जागांबाबत काय होऊ शकते याचा घेतलेला हा आढावा…

नगर शहरात जगताप यांच्या विरोधात कोण?
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी नगरचा निकाल फिरवला. नगर शहरातील मुस्लिम बहुलभागातील मतदान केंद्रात विखेंना एक आकडी तर लंके यांना तीन-चार आकडी मते मिळाली. आपण ठरवू तो उमेदवार आपण विजयी करू शकतो ही भावना यानिमित्ताने मुुस्लिम मतदारांमध्ये वाढीस लागलीय आणि ते स्वाभाविक आहे. दुसरीकडे आ. संग्राम जगताप यांच्यासमोर पर्याय म्हणून आजतरी आश्वासक चेहरा दिसत नाही. महाविकास आघाडीतील काँग्रेसकडे किरण काळे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिषेक कळमकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड ही नावे चर्चेत आहेत. महायुती असली तरी भाजपाकडून माजी नगराध्यक्ष वसंत लोढा, शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, बाबासाहेब वाकळे, भैय्या गंधे ही नावे चर्चेत आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे गटाकडून अनिल शिंदे, दिलीप सातपुते ही नावे चर्चेत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत झाल्यास महायुतीच्या आ. संग्राम जगताप यांच्यासमोर आजतरी महाविकास आघाडीकडे तुल्यबळ असा चेहरा दिसून येत नाही. मात्र, सक्षम पर्याय म्हणून तिसरेच नाव समोर येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्याकडून नगर शहरात आतापासूनच लक्ष घालण्यास प्रारंभ झाला असल्याने त्यांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे.

मोनिकाताईंच्या विरोधात ढाकणे की चंद्रशेखर घुले?
शेवगाव- पाथर्डी या विधानसभा मतदारसंघात सलग दोनवेळा भाजपाच्या मोनिकाताई राजळे या निवडून आल्या आहेत. लोकसभेतील आकडेवारी पाहता यावेळी राजळे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. अर्थात, त्यातही चंद्रशेखर घुले हे काय निर्णय घेतात यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. मात्र, यावेळी कोणत्याही परिस्थितीत आरपारची लढाई करण्याची भूमिका प्रतापराव ढाकणे यांनी घेतलेली दिसतेय. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक गाव- वाडी- वस्तीवर जात आपल्या स्वत:ची निवडणूक असल्यागत ढाकणे यांनी मतदारसंघ पिंजला. नव्या- जुन्यांचा मेळ घालत त्यांनी तगडा संच उभा केल्याचे कालच्या लोकसभेत तरी जाणवले. सौभाग्यवती प्रभावती आणि कारखान्याचे अध्यक्ष असलेले चिरंजीव यांनी गेल्या काही वर्षात मतदारसंघ पिंजला आहे. एकणूच जातीय समिकरणे या मतदारसंघात कायमच निर्णायक ठरत आली आहेत. याशिवाय हर्षदाताई काकडे यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळेच येथील लढाई यावेळी यापूर्वीच्या निवडणुकांपेक्षा वेगळी आणि निर्णायक झाल्याचे दिसून आल्यास आश्चर्य वाटू नये.

नेवाशात शंकरराव गडाखच; चिन्ह कोणते हाच चर्चेचा विषय!
नेवासा मतदारसंघात आजतरी सबकुछ शंकरराव गडाख हेच आहेत. संयमी आणि शांत स्वभाव आणि जोडीने मंत्रीपदाच्या माध्यमातून केलेली कामे ही त्यांची आता यावेळच्या जमेची बाजू आहे. मागीलवेळी बॅट चिन्हावर थेट विधानसभेचा षटकार ठोकल्यानंतर शिवबंधन हाती बांधत मंत्रीपद मिळविणारे शंकरराव गडाख हेच पुन्हा येथील उमेदवार असतील. मात्र, त्यांची उमेदवारी ठाकरेंचे मशाल चिन्ह घेऊन असेल तरी बॅट चिन्ह याबाबत अद्यापतरी स्पष्टता नाही. त्यांच्या विरोधात विठ्ठलराव लंघे, बाळासाहेब मुरकुटे ही नावे चर्चेत असली तरी त्यांच्या गोटात अद्यापतरी शांतता आहे. अवघ्या काही महिन्यांवर निवडणूक आली असताना विरोधी उमेदवार आणि या अनुषंगाने हालचाली दिसत नाहीत. मात्र, समोर विरोधी उमेदवार नाही म्हणून शंकरराव गडाख आणि त्यांचे सहकारी शांत बसलेले नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून म्हणजेच लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यापासूनच गडाख समर्थकांनी विधानसभेची रंगीत तालिम केली आणि खुंटा अधिक बळकट केला असे म्हणण्यास वाव मिळतो.

राहुरीत तनपुरे- कर्डिले लढत होणार की तिसराच पर्याय समोर येणार?
राहुरी, नगर आणि पाथर्डी या तीन तालुक्यात विभागला गेलेल्या राहुरी मतदारसंघ! भाजपाचे शिवाजी कर्डिले यांचा या मतदारसंघावर वरचष्मा आहे. मात्र, मागील निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिले यांचा पराभव केला आणि गेल्या साडेचार- पाच वर्षात या मतदारसंघावर मोठी पकड निर्माण केली. राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर त्या पदाचा फायदा जिल्ह्याला किती झाला याहीपेक्षा त्यांच्या राहुरी मतदारसंघाला झाला. प्राजक्त तनपुरे यांनी अगदी ठरवून या मतदारसंघातील गाव आणि वाड्या-वस्त्यांवर लक्ष केंद्रीत केले आणि विकास कामे मार्गी लावली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेल्या शिवाजी कर्डिले यांची या मतदारसंघावर आजही पकड आहे. कार्यकर्त्यांचा मोठा संच येथे आहे. जोडीला विखे पाटलांची यंत्रणा देखील आहे. येथे या दोघांमध्येच लढाई अपेक्षीत असली तरी कर्डिले यांनी श्रीगोंदा मतदारसंघातून लढण्याबाबत मोठी मागणी पुढे आली आहे. कर्डिले यांनी श्रीगोंदेकरांच्या मागणीनुसार विचार केल्यास राहुरीत तनपुरे यांच्यासमोर तिसरा पर्याय देण्यासाठी विखेंची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

कर्जत-जामखेडमध्ये रामभाऊंच्या नव्हे देवेंद्रजींच्या प्रतिष्ठेचा विषय!
लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच सुजय विखे यांच्या विरोधात वातावरण तापवण्यास आणि विखे विरोधी सुरुंग पेरण्यात प्रा. राम शिंदे आघाडीवर राहिले. सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर झाली तरी राम शिंदे यांची नाराजी कायम राहिली. एकदिलाने लढलो असे सांगताना रामभाऊंच्या चेहर्‍यावरील हावभाव सारे काही सांगून जात असल्याचे लपून राहिले नाही. राम शिंदे यांच्या या भूमिकेला थेट देवेंद्र फडणवीस यांचे आशीर्वाद होते आणि राहिले या चर्चा आजही कायम आहेत. पाडापाडीच्या राजकारणातील पहिला अध्यायच नगरमध्ये झाला आणि त्या पापाचा धनी राम शिंदे हेच राहिले आणि पडद्याआड देवेंद्र फडणवीस! विधानसभेसाठी राम शिंदे हेच उमेदवार असणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्याचवेळी जाहीर केले आहे. आता त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून आ. रोहित पवार असणार की अन्य कोण याची चर्चा कायम आहे. रोहीत पवार हे पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून लढणार असल्याच्या चर्चा झडत आहेत. राम शिंदे यांचा खांदा वापरत निशाणा साधण्याची खेळी खेळणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी येथील निकाल महत्वाचा मानला जात आहे.

पाचपुतेंच्या विरोधात अर्धाडझन इच्छुक; कर्डिलेंना श्रीगोंदेकरांचे आमंत्रण!
सहकाराशी निगडीत असणार्‍या या मतदारसंघात भाजपाचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. आजारपणामुळे त्यांचा संपर्क गेल्या काही महिन्यांपासून कमी झाला असला तरी सौभाग्यवती प्रतिभाताई आणि चिरंजीव विक्रमसिंह यांनी ही उणिव भरुन काढण्याचा प्रयत्न केला आहे. पाचपुते आणि नागवडे या दोघांकडे साखर कारखानदारीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. मागीलवेळी अवघ्या चार- सहा हजार मतांनी विजयी झालेल्या पाचपुते यांच्यासमोर यावेळी आव्हान असणार आहे. विरोधी उमेदवारीसाठी माजी आमदार राहुल जगताप, सौ. अनुराधा राजेंद्र नागवडे, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, अण्णासाहेब शेलार, घनश्याम शेलार अशी दिग्गजांची नावे आहेत. नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटातील गावे या मतदारसंघात आहेत. या दोन गटांमधील गावांना गेल्या काही वर्षात सापत्न वागणूक मिळाली आणि त्याच मुद्यावर यावेळी ही गावे एकत्र आली आहेत आणि आपलाच माणूस आमदार करायचा अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांचे नाव येथे चर्चेत आले आहे. कर्डिले यांचे श्रीगोंदा तालुक्यात स्वत:चे नातेवाईक, मित्र परिवार मोठा आहे. याशिवाय मांडवगण गटात अरुणकाका जगताप यांचा मोठा संपर्क आणि काम आहे. त्याजोरावरच श्रीगोंदेकरांकडून कर्डिले यांच्या उमेदवारीचे संकेत मिळत आहेत.

कोपरगावमधील संघर्ष निर्णायक वळणावर!
कोपरगावमध्ये कायमच काळे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष पाहण्यास मिळत आला. यावेळी आ. आशुतोष काळे हे महायुतीतील अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यामुळेच भाजपामध्ये असूनही कोल्हे यांची मोठी पंचाईत झाली. आता विधान परिषदेच्या माध्यमातून शिक्षक मतदारसंघात विवेक कोल्हे हे नशिब आजमावत आहेत. विवेक कोल्हे यांच्या बाजूने हा निकाल लागला तर या मतदारसंघातील राजकीय गणिते बदलू शकतात. आशुतोष काळे यांनी मतदारसंघात मोठी कामे मार्गी लावली असल्याने व ते महायुतीत असल्याने त्यांचीच उमेदवारी अंतिम असणार आहे. मात्र, महायुतीत असलेल्या कोल्हे यांची गोची होणार आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचा मोठा चेहरा समोर आलेला दिसत नाही.

श्रीरामपुरात लहू कानडेंच्या विरोधात कोण?
मतदारसंघ पुनर्रचनेने आरक्षीत झालेल्या या मतदारसंघावर कायमच राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व राहिले. मागील निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा करिष्मा चालला आणि त्यांनी येथे सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या लहू कानडे यांना हातात पंजा घेत निवडून आणले. कानडे यांनी थोरात यांची भक्कम साथ देताना मतदारसंघात कामे मार्गी लावली. आता यावेळी या आरक्षीत मतदारसंघाचा शेवटचा आमदार कोण हे ठरवणारी ही निवडणूक असणार आहे. कानडे यांनी चांगली मशागत चालवली असून विरोधात कोण याबाबत अद्यापतरी संदीग्धता दिसते.

अकोलेत लहामटे यांच्या विरोधात पुन्हा पिचडच!
अकोले या आदिवासी बहूल मतदारसंघावर ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे कायमच वर्चस्व राहिले. शेजारी म्हणून बाळासाहेब थोरात यांचे जसे या मतदारसंघावर लक्ष असते तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांचेही असतेच! अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या विरोधात येथे मोठे वातावरण तयार झाले आहे. विकास कामे केली असली तरी त्यांच्याबद्दलची नाराजी कायम आहे. वैभव पिचड यांचे नेटवर्क येथे आजही भक्कमपणे उभे आहे. पिचड यांनी बेरजेचे राजकारण केले असताना दुसरीकडे लहामटे यांच्या विरोधात नेतेमंडळी देखील गेली आहेत. त्यामुळेच येथे यावेळी पिचड यांच्यासाठी चांगले वातावरण असल्याचे दिसते.

राणीताई लंके याच एकमेव आश्वासक चेहरा; संदेश कार्ले ठरू शकतात तिसरा पर्याय!
लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने व त्यात पारनेरकरांनी भरभरुन मते दिल्याने या मतदारसंघात खा. नीलेश लंके ठरवतील तोच आमदार होणार! लोकसभा निवडणुक चालू असताना आणि निकालानंतरही येथून राणीताई लंके याच उमेदवार असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्हा परिषद सदस्या म्हणून त्यांनी काम केले आहे. पारनेरमधील मतांचे गणित आणि विरोधकांमधील बेदीली विचारात घेतली तर राणीताई लंके याच आमदार होणार अशी आजची परिस्थती आहे. खा. लंके यांचे समर्थक राणीताई लंके यांच्याऐवजी दुसरा कोणताही उमेदवार स्वीकारणार नाहीत. मतदारसंघावर प्रचंड पकड आणि निष्ठावान, तितकीच पदरमोड करणार्‍या कार्यकर्त्यांची फळी लंके यांच्यासोबत आहे आणि त्याच जोरावर लोकसभा आणि आता नव्याने होणारी विधानसभा ते जिंकणार! विरोधी बाजूला लंके यांच्यासमोर तग धरेल असा चेहराच नाही. ज्यांची नावे चर्चेत आहेत, त्यांना पाडण्यासाठी लंके यांच्याहीपेक्षा त्यांचे स्वकीयच जास्त पुढे असणार असल्याने येथून कोणतेही चिन्ह घेतले तरी राणीलंके याच उमेदवार असणार यात शंका नाही. नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट या मतदारसंघाला जोडले आहेत. या गावांमध्ये देखील सापत्नपणाची भावना वाढीस लागली असून त्यातूनच संदेश कार्ले हा सामान्य चेहरा समोर आला आहे. कार्ले यांचे नाव नगर तालुक्यातील दोन गटांमधील गावांनी सहमतीने लावून धरले तर पारनेरमधील स्थानिक उमेदवारांच्या मतविभागणीत संदेश कार्ले विधानसभेत दिसल्यास आश्चर्य वाटू नये!

संगमनेरमध्ये थोरात तर शिर्डीत विखे पाटील!
संगमनेर आणि शिर्डी या दोन विधानसभा मतदारसंघ अनुक्रमे बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी कायमच ताब्यात ठेवले आहेत. मताधिक्ंय कमीजास्त झाल्याचे दिसून आले तरी दोघांचीही या मतदारसंघावर कडवी पकड असल्याचे लपून राहिले नाही. विखे- थोरात या दोघांमध्ये विळ्याभोपळ्याचे असणारे सख्य कालच्या लोकसभेनंतर अधिक तीव्र झालेले दिसत आहे. त्यातूनच आता दोघांकडूनही एकमेकांना शह देण्यासाठीची रणनिती आखली जात आहे. जिल्ह्यातील अन्य दहा मतदारसंघात दोघांकडूनही एकमेकांचे समर्थक आणि त्यांना ताकद देताना उट्टे काढण्याच्या खेळी खेळल्या जाणार आहेत. मात्र, काहीही झाले तरी दोघेही त्यांच्या-  त्यांच्या मतदारसंघात आजही प्रभावी आहेत. दोघांच्यासमोर आज तरी आश्वासक चेहरा दिसायला तयार नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...