७० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले.
अहमदनगर| नगर सहयाद्री
बसमधून लग्नासाठी निघालेल्या महिलेच्या पर्समधील ७० हजारांचे सव्वा दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. ही घटना सोमवारी (दि. १२) सकाळी पुणे बस स्थानक ते केडगाव दरम्यान घडली. कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. नितीन राम गायकवाड (वय ४५ रा. भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. १८ फेब्रुवारीला मुंबई येथे लग्न असल्याने फिर्यादीची पत्नी व दोन मुले यांना जायचे होते. फिर्यादी यांनी त्यांना सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे बस स्थानकावर सोडून ते घरी गेले. फिर्यादीच्या पत्नीकडे पर्समध्ये पाऊण तोळ्याचे सोन्याचे डोरले व दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण होते. प्रवासा दरम्यान डोरले व गंठण चोरीला गेल्याचे समजले. त्याचा पतीने दुसर्या दिवशी कोतवाली पोलीसांकडे फिर्याद दिली.
नगरमध्ये २० ला निर्भय बनो सभा
अहमदनगर-
मंगळवार दि. २० फेब्रुवारीला नगर शहरात निर्भय बनो सभा होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यामध्ये संबोधित करतील. लोकशाही बचाव मंचाने यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी निर्भय बनोच्या जाहीर सभांचे आयोजन केले जात आहे. त्याला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे. सायंकाळी ५.३० वा. माऊली सभागृह, झोपडी कॅन्टीन येथे सभा होणार आहे. लखनऊ व नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे सभेच्या अध्यक्षस्थानी असतील अशी माहिती मंचचे कार्यकर्ते किरण काळे, प्रा.डॉ.बापू चंदनशिवे, दीपक ससाणे, इंजि. सुजित क्षेत्रे, देवराम शिंदे आदींनी दिली आहे.
मनपाच्या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये धावपळ
अहमदनगर-
महापालिकेकडून मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी आक्रमक कारवाई सुरू आहे. दोन दिवसात ४७ मालमत्ताधारकांचे नळ कनेशन तोडून पाणी बंद करण्यात आले आहे. चार मालमत्तांवर जप्ती कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मोहिमेमुळे थकबाकीदारांची धावपळ उडाली असून, दोन दिवसात सुमारे १९ लाखांचा कर जमा झाला आहे. वर्षभरात महापालिकेची अवघी ४५.८४ कोटींची कर वसुली झाली आहे. २०४.६६ कोटींची थकबाकी अद्यापही बाकी आहे. वारंवार शास्ती माफीची योजना राबवूनही प्रतिसाद मिळत नसल्याने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपासून कारवाईला गती मिळाली आहे. चारही प्रभाग अधिकार्यांकडून थकबाकीदारांना नोटीसा व जप्ती वॉरंट बजावल्याचे उपायुक्त डॉ. सचिन बांगर यांनी सांगितले.
अमली पदार्थाचे सेवन करून आरडाओरड; चौघांना अटक
अहमदनगर-
नगर शहरातील बॉईज हायस्कुल ग्राऊंड, लेरा ब्रुस येथे रात्री गांजाचे सेवन करून आरडाओरड करत, नागरिकांना त्रास होईल असे कृत्य केल्याने चौघांना अटक केली. अमोल प्रदिप कदम (वय २४), सोमनाथ राजू केदारे (वय २०, रा. बोल्हेगाव), योगेश राम सटाले (वय २९, रा. सारसनगर), अनिकेत शंकर वाकळे (वय २१, रा. काटवन खंडोबा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
जात नोंदीचे बनावट माहिती सादर; गुन्हा दाखल
अहमदनगर-
जात नोंदीचे बनावट दाखले सादर करून जात प्रमाणपत्र काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. इंदर नन्हु शर्मा (पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. जिल्हा जात पडताळणी समितीच्या पोलीस निरीक्षक स्वाती थोरात यांनी फिर्याद दिली आहे. इंदर शर्मा याने त्याच्या मुलाच्या नावे लोहार जाती दावा शैक्षणिक प्रकरण १ डिसेंबर २०२२ रोजी येथील जात प्रमाणपत्र समितीकडे सादर केले होते. प्रस्तुत प्रकरणात दाखल पुराव्यांची छानणी केली असता, हे प्रकरण पोलीस दक्षता पथकाकडे वर्ग करण्यात आले होते. त्या अनुषंगाने पथकाने शालेय चौकशी केली असता इंदर नन्हु शर्मा व नन्हु मदन शर्मा यांच्या नावाची शाळेच्या मूळ रजिस्टरमध्ये नोंदी आढळल्या नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अर्बन बँक घोटाळ्या प्रकरणी सीए शंकर अंदानी अटकेत
अहमदनगर-
नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सीए शंकर घनशामदास अंदानी याला नगर शहरातून अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी घेतल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पहिलीच कारवाई करण्यात आली आहे.नगर अर्बन बँक सध्या घोटाळ्यावरून गाजत आहे. मुंबईच्या डी. जी. ठकरार अँड असोसिएटस फर्मने बँकेच्या कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडीट केले. त्यानुसार १०५ जणांनी बँकेला लुटल्याचे स्पष्ट झाले आहे.सीए अंदानी याला उपअधीक्षक मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बुधवारी सायंकाळी अटक केली आहे. तो बँकेचा तज्ज्ञ संचालक म्हणून कार्यरत होता. त्याने कर्जदारासोबत व्यवहार केल्याची माहिती आहे.