अहमदनगर / नगर सह्याद्री : प्रवाशांचे दागिने लुटणारे तिघे चोरटे एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. अक्षय उर्फ दीपक यशंवत आव्हाड (रा.सोनगाव पाथरा, ता.राहता), फिरोज उर्फ लखन अजिज शेख (रा.मूकीमंदपूर, ता.नेवासा), अमरचिलु कांबळे (रा मूकीमंदपूर, ता.नेवासा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अधिक माहिती अशी : २१ जानेवारीस संगीता सांरगधर वांदेकर (वय-४८ वर्ष, रा.विदयाकॉलनी) यांनी फिर्याद दिली होती की, कोल्हार घाटात पतीसह गाडीवर जात असताना तिघांनी गाडीस कट का मारला. अशी विचारणा करत आमची गाडी थांबविली. त्या तिघांनी गळयातील गंठण व मिनी गंठण हे चोरून घेऊन पसार झाले. या गुन्ह्याचा तपास करत असताना सपोनि माणिक चौधरी यांना हा गुन्हा वरील आरोपींनी केल्याची माहिती मिळाली. एमआयडीसी पॉलिसीच्या पथकाने या आरोपीना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून गुन्हयातील ५० हजार रुपये किमतीचे मिनीगंठण जप्त केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी (प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन), पोसई योगेश चाहेर, पोहेकों नंदकुमार सांगळे, राजू सुद्रीक, पोना विष्णू भागवत, महेश बोरुडे आदींच्या पथकाने केली.