अहमदनगर : तोफखाना पोलिसांनी सावेडी येथून गांजासह एकास ताब्यात घेतले आहे. अमोल मदन सदाफुले (वय 34 वर्षे, हल्ली रा.दातरंगे मळा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १२ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत सुमित सदाशिव गवळी (वय ३८, नेमणूक तोफखाना पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे, १ फेब्रुवारीस रात्री दहाच्या सुमारास पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मधुबन कॉलनी, सहकार सावेडी येथे राहत्या घरात एका व्यक्तीने गांजा विक्रीच्या दृष्टीने बाळगून ठेवला असल्याची गुप्त माहिती मिळाली.
त्यानुसार त्यांनी सुमित सदाशिव गवळी यांसह पथकास माहिती देत कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस पथकाने पंचासमक्ष त्या ठिकाणी जात छापा टाकला. तेथे अमोल मदन सदाफुले हा आढळून आला. घराची झडती घेताच दोन ट्रॅव्हल्स बॅगमध्ये ५ लाख १० हजारांचा 34 किलो गांजा आढळून आला. ७ लाख ५० हजारांची कार, एक हजारांची ट्रॅव्हल बॅग, एक हजारांचा वजनकाटा असा १२ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.