अहमदनगर / नगर सह्याद्री : कोतवाली पोलिसांनी विनापरवाना बेकायदेशीर रित्या कॅल्शीयम कार्बाईड नावाचा ज्वलनशील व स्फोटक पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकत व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. रोहीत नवनीत चुत्तर (वय 31 वर्षे, रा. बुरुडगल्ली, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झाल्याचे नाव आहे. मे.एन.सुरेशलाल अँड कंपनी या दुकानामधून 12 हजार 650 रुपयांचा 115 किलो कॅल्शीयम कार्बाईड पदार्थ जप्त केला.
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांना वरील दुकानात विनापरवाना कॅल्शीयम कार्बाईड विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी याबाबत कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना याबाबत माहिती दिली. पोलीस निरीक्षक दराडे यांच्या सूचनेनुसार सहा.पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी पोलीस पथकासह याठिकाणी छापा टाकला. 115 किलो कॅल्शीयम कार्बाईड जप्त केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनिरी.महेश जानकर, गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ. तनवीर शेख, भानुदास सोनवने, शाहीद शेख, संदिप पितळे, पो.ना. अविनाश वाकचौरे, मपोना संगीता बडे आदींच्या पथकाने केली.