अहमदनगर / नगर सह्याद्री :
येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या निमित्ताने देशभर दिवाळी साजरी केली जाईल. अहमदनगर जिल्ह्यातही श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने असणारा उत्साह केवळ मोठाच नव्हे तर विश्वविक्रमी होईल. या दिवशी जिल्हाभरात तब्बल 21 लाख लाडू श्रीराम चरणी नैवद्य म्हणून अर्पिले जाणार आहेत.
भाजपसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, धार्मिक संघटना, संस्थांच्या वतीने जिल्ह्यातील राम मंदिर तसेच हनुमान आदी देवी-देवतांची मंदिरे आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेत. जिल्हाभरात विविध कार्यक्रम होणार आहेत.
याच अनुषंगाने अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांनी मतदारसंघातील गावोगावी साखर डाळ वाटप केली असून त्यापासून लाडू बनवण्याचे आवाहन केले आहे. यातील दोन लाडू परिसरातील श्रीराम, हनुमान मंदिरात प्रसाद म्हणून मूर्तीपुढे ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
400 पेक्षा अधिक गावांत मोफत साखर-डाळ वाटप झाले आहे. यातून प्रत्येक घरातून केवळ दोन नैवेद्य म्हणून येणाऱ्या लाडवांची संख्या 21 लाखावर असणार आहे. त्यामुळे एकीकडे अयोध्येत श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होत असताना नगर जिल्ह्यात तब्बल 21 लाख लाडूंचा नैवेद्य श्रीराम चरणी अर्पित होणार आहे.