अहमदनगर। नगर सहयाद्री-
आठवड (ता. नगर) येथील दत्तात्रय बाळासाहेब मोरे या युवकाच्या हत्या प्रकरणी चौघांना जन्मठेपेची शिक्षा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी ठोठावली होती. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने ही शिक्षा कायम ठेवली आहे.
दत्तात्रय मोरे आणि बन्सी किसन लगड यांच्यात वाद झाले होते. मोरे यांच्या घरी १२ मार्च २०१५ रोजी धार्मिक कार्यक्रम होता. ते गावातील महिलांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यास गेले होते. निमंत्रण देऊन सायंकाळी सात वाजता घरी आले. त्यावेळेस पूर्ववैमनस्यातून आरोपी सतीश बन्सी लगड (वय २०), बन्सी किसन लगड (वय ५०), किसन गणपत लगड (वय ७२), आशाबाई बन्सी लगड (वय ४५, सर्व रा. वाघजई मळा, आठवड) यांनी त्यांना मारहाण केली.
या मारहाणीमुळे दत्तात्रय मोरे यांचा मृत्यू झाला. बाळासाहेब मोरे यांच्या फिर्यादीवरून चौघांविरूद्ध खून, मारहाणीचा गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला होता. तात्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण आणि तात्कालीन सहायक पोलीस निरीक्षक तुषार आढाव यांनी गुन्ह्याचा तपास केला. येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश कुलकर्णी यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली.
यात १८ साक्षीदार तपासले. अॅड. पुष्पा कापसे-गायके यांनी सरकारतर्फे काम पाहिले होते. या खटल्यात चौघांनाही जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या निकाला विरोधात आरोपींनी खंडपीठात अपिल दाखल केले. खंडपीठाने चौघांची शिक्षा कायम ठेवली आहे.