ठेवी 1380 कोटी 19 लाखांवर तर 950 कोटी 77 लाखांचे कर्ज वितरण
अहमदनगर । नगर सहयाद्री-
अहमदनगर मर्चंटस् को ऑप. बँकेची स्थापना सन 1973 मध्ये झाली. एका छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले असून सुवर्णमहोत्सवी वर्षात बँकेने मोठी आर्थिक उंची गाठली असून बँक भक्कम आर्थिक पायावर उभी आहे. आर्थिक वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरीची परंपरा यंदाही बँकेने कायम राखली आहे. 31 मार्च 2024 अखेर बँकेच्या ठेवी 1380 कोटी 19 लाख रुपयांवर पोहचल्या असून गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत ठेवींमध्ये 36 कोटी 35 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. 31 मार्च 2024 अखेर बँकेचे कर्ज वितरण 950 कोटी 77 लाख रुपये असून गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर्ज वितरणात 68 कोटी 13 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्षात कर्जदारांना व्याजामध्ये 25 कोटी 16 लाख रुपयांचा भरघोस रिबेट देऊन बँकेस 30 कोटी 13 लाखांचा ढोबळ नफा तर आयकर तसेच रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य तरतुदी केल्यानंतर बँकेस 31 मार्च 2024 अखेर 6 कोटी 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांनी दिली.
चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांनी सन 2023-2024 या आर्थिक वर्षातील बँकेच्या आर्थिक कामगिरीचा लेखाजोखा पत्रकार परिषदेत सादर केला. यावेळी व्हा.चेअरमन अमित मुथा, संचालक अनिल पोखरणा, कमलेश भंडारी, आनंदराम मुनोत, संजय बोरा, किशोर गांधी, सीए, आयपी अजय मुथा, सी.ए.मोहन बरमेचा, संजय चोपडा, किशोर मुनोत, संजीव गांधी, प्रमिलाताई बोरा, विजय कोथिंबिरे, सुभाष भांड, सुभाष बायड, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य राजेश झंवर, कर्मचारी प्रतिनिधी प्रसाद गांधी, जितेंद्र बोरा, सीईओ सुनिल पुराणिक, जॉइंट सीईओ नितीन भंडारी आदी उपस्थित होते.
चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांनी सांगितले की, बँकेचे सभासद, खातेदार, ठेवीदार, हितचिंतक यांचा बँकेवर असलेल्या दृढ विश्वासामुळेच तसेच सर्व सहकारी आजी माजी संचालक, बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे बँकेने गरूडझेप घेतली आहे. बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात बँकेचे सभासद, ठेवीदार, खातेदार यांच्यासाठी सुवर्णमहोत्सव ठेव योजना राबविण्यात आली, त्यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बँकेच्या सभासदांना तसेच कर्मचाऱ्यांना 5100 रुपयांची ठेव पावती देण्याचा मानस असून त्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी मागितली आहे. तसेच सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याबाबतही रिझर्व्ह बँकेकडे परवानगी मागण्यात आली आहे. बँकेला श्येडुल्ड बँकेचा दर्जा मिळवण्यासाठीही प्रयत्न चालू असून लवकरच त्यास मंजूरी मिळेल असा विश्वास हस्तीमलजी मुनोत यांनी व्यक्त केला.
बँकेमार्फत नजरगहाण कर्जाव्यतिरिक्त गृहतारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, सोनेतारण कर्ज, वाहन कर्ज, वस्तू कर्ज, शेअर्स तारण कर्ज, शॉप, ऑफिस खरेदी कर्ज, कमर्शियल इमारत बांधकाम कर्ज, स्थावर मिळकत तारण कॅश क्रेडिट, स्वामिनी गृहकर्ज योजना, गृहनिर्माण विस्तार/सुधारणा योजना, टॉप अप कर्ज योजना, मालमत्ता तारण कर्ज योजना (किरकोळ तारण कर्ज) (लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी), स्वयंरोजगार आदी कर्ज सभासदांना उपलब्ध असून त्याचा अनेक सभासद लाभ घेत आहेत. नजरगहाण कर्ज खात्यावरील व्याजदर रिबेट वजा जाता द.सा.द.शे. 8 टक्के, सोनेतारण कर्ज 25 लाखापर्यंत 7.50 टक्के, वाहन कर्ज (प्रायव्हेट कार) 25 लाखापर्यंत 8 टक्के, गृहतारण कर्ज 25 लाखापर्यंत 7 टक्के दराने असून ते कोणत्याही नागरी सहकारी बँकेपेक्षा कमी आहे.
ठेवीदारांना ठेवीवर जास्तीत जास्त व्याज देवून तसेच इतर सरकारी बँकांच्या तुलनेत कर्जावर कमीत कमी व्याज आकारणी यामुळे बँकेस ठेवीवर द्यावे लागणारे व्याज व कर्जावर मिळणारे व्याज यातील अंतर दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच बँकेच्या व्यावसायिक खर्चातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. याही परिस्थितीत कर्जदारांना व्याजामध्ये 25 कोटी 16 लाख रुपयांचा रिबेट देवून बँकेने 30 कोटी 13 लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळवला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ढोबळ नफा कमविणारी अहमदनगर मर्चंटस को.ऑप.बँक बहुधा नगर जिल्ह्यातील एकमेव सहकारी बँक असावी.
सी.ए.आयपी अजय मुथा यांनी सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त बँकिंग सेवा देण्यासाठी मर्चंटस बँकेने सीबीएस सिस्टिमचे अपग्रेडेशन करण्याचे ठरविले आहे. यात एपीआय (अरिदमेटिक प्रोग्रामिंग इंटरफेस) आणि एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर करण्यात येणार आहे. जागतिक दर्जाच्या या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांचे बँकिंग व्यवहार करणे अधिक सुलभ होणार आहे. याशिवाय डायरेक्ट सीटीएस, कस्टमर केअर सिस्टिम, एआय चॅटबोट, व्हाटसअप बँकिंग सुविधाही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
ग्राहकांना काळानुरुप अत्याधुनिक बँकिंग सुविधा मर्चंटस् बँकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, क्युआर कोडव्दारे ऑनलाईन पेमेंट, युपीआयव्दारे गुगल पे, फोन पे, भीम ॲपव्दारे सेवा उपलब्ध आहे. इंटरनेटवर ई स्टेटमेंट, ई पासबुक, डायरेक्ट आरटीजीएस व एनईएफटी सुविधा, आयएमपीएस, भारत बिल्स पेमेंट, पॉझिटिव्ह पे सिस्टिम, एटीएम रिसायकलर मशीन, किऑस्क पासबुक मशीन इत्यादी अत्याधुनिक सोयी सुविधा बँकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. खातेदारांना अधिक जलद, अचूक सेवा मिळण्यासाठी संचालक मंडळाने सॉफ्टवेअर अपग्रेडेशन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे सदरचे अपग्रेडेशन लवकरच पूर्ण करण्यात येईल. बँकेच्या दाळमंडई, मार्केटयार्ड, चितळे रोड शाखेत बचत ठेव खातेदारांसाठी ऑटोमॅटिक पासबुक प्रिंटर किऑस्क मशीन बसविण्यात आलेली आहेत. त्यामुळे खातेदारांना स्वत:चे पासबुक काही क्षणांमध्ये प्रिंट करून घेता येते व त्यांच्या वेळेतही बचत होते. कोअर बँकिंग प्रणालीमध्ये ग्राहकांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी बँकेच्या कोअर बँकिंग उपसमितीचे सदस्य सीए, आयपी अजय मुथा, सीए मोहन बरमेचा, संजीव गांधी यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
दि.31 मार्च 2023 अखेर बँकेचे रिझर्व्ह व इतर फंड 192 कोटी 9 लाख रुपयांचे होते. अहवाल साली त्यात 20 कोटी 41 लाख रुपयांनी वाढ होवून दि.31 मार्च 2024 अखेर बँकेचे एकूण रिझर्व्ह व इतर फंडस 212 कोटी 50 लाख रुपयांचे झाले आहेत. बँकेच्या संचालक मंडळाचे सर्व सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेवून कर्जाची जास्तीत जास्त वसुली करण्याचा प्रयत्न केला. दि.31 मार्च 2024 अखेर बँकेच्या निव्वळ एनपीएचे प्रमाण 2.46 टक्के आहे.
भारत सरकारने बँकांच्या बचत ठेव खातेदारांसाठी लागू केलेली पंतप्रधान अपघात विमा योजना बँकेमार्फत राबविली जात आहे. सदर अपघात विम्याच्या प्रिमियची रक्कम बँक खातेदारांकडून वसूल न करता बँकेच्या नफ्यातून भरत आहे. गत आर्थिक वर्षात सदर प्रिमियमची 8 लाख 8 हजार रुपयांची रक्कम बँकेने भरली आहे. बँकेने सुवर्णमहोत्सव पूर्ण करून 51 व्या वर्षात पदार्पण केले आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षात बँकेने सुवर्णमहोत्सवी लोगो अनावरण, अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी स्नेहसंमेलन, क्रिकेट स्पर्धा, मोटिव्हेशनल स्पीकर डॉ.उज्वल पाटणी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. सुवर्णमहोत्सवी वर्ष समारोहाची सांगता केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची नियुक्ती करणे नागरी सहकारी बँकांना बंधनकारक आहे. त्यानुसार बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक संजीव गांधी यांच्या अध्यक्षतेखाली राजेश झंवर, पेमराज बोथरा व सीए प्रविण कटारिया यांची बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्यपदी नियुक्ती केली आहे. बँकेच्या कामकाजात बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.
बँकेचे कर्मचारी ही बँकेची मोठी मालमत्ता आहे व सर्व कर्मचारी बँक ही आपली स्वत:ची संस्था आहे असे समजून खातेदारांना तत्पर व बिनचूक सेवा देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे बँकेस संपूर्ण महाराष्ट्रात नावाजले जाते. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त दरवर्षी 28 मार्च रोजी बँकेतर्फे मानवतावादी दृष्टीकोनातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी सदर शिबिरात 1515 रक्त पिशव्यांचे संकलन झाले. बँकेच्या सभासदांसाठी बँकेने सभासद कल्याण निधी उभारला आहे. सभासदांना मोठ्या आजारावरील उपचारांसाठी ना परतीचे अर्थसहाय्य दिले जाते. एखाद्या सभासदाचा दुर्देवाने मृत्यु झाल्यास सभासदाच्या पत्नीस 30 महिने दरमहा एक हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. बँकेचे कायम सेवक व त्यांच्या कुटुंबियांची दरवर्षी दोन लाखांची फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी बँकेतर्फे उतरवली जाते. तसेच एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्देवाने मृत्यु झाल्यास त्या सेवकाच्या पत्नीस 60 महिने दरमहा 2 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. तसेच बँकेने सर्व कर्मचाऱ्यांचा पाच लाख रुपयांचा अपघाती विमाही उतरवला आहे.
बँकेच्या अहमदनगर शहरात 7, नगर जिल्ह्यात जामखेड, श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी, सोनई तर नगर जिल्ह्याबाहेर छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 शाखा तर पुणे जिल्ह्यात 3 शाखा आणि बीड जिल्ह्यात 1 अशा एकूण 18 शाखा कार्यरत आहेत. मर्चंटस् बँकेत खाते असणे ही नगर शहर व जिल्ह्यातीलच नव्हे तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड येथील नागरिकांसाठी देखील अभिमानाची गोष्ट झाली आहे. अवघ्या 52 वर्षांत मर्चंटस् बँक ही नगर जिल्ह्यातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जात असून मर्चंटस् बँकेचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात नावाजले जाते. या प्रगतीमध्ये बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार, ग्राहकांचा मोलाचा वाटा असल्याचे हस्तीमलजी मुनोत यांनी सांगितले. शेवटी व्हाईस चेअरमन अमित मुथा यांनी उपस्थितांचे आभार मानताना मर्चंटस् बँकेच्या सेवेचा लाभ अधिकाधिक लोकापर्यंत पोहचण्यासाठी मार्केटिंग टिम कार्यरत करण्यात आल्याचे सांगितले.