श्रीगोंदा ।नगर सहयाद्री:-
येथील गजानन कॉलनी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत महाराष्ट्र राज्यात विक्रीस व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेला पानमसाला गुटखासह ६ लाख १६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रवी बबन दळवी (वय 39, रा. रोकडोबा चौक, ता. श्रीगोंदा ) असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे श्रीगोंदा येथील गजानन कॉलनी परिसरातील रवी दळवीच्या गोडाऊनवर छापा टाकला. सदर ठिकाणी पानमसाला व गुटखा साठवला असल्याचे आढळले.
गोडाऊनमधून १ लाख ३० हजार ६८० रुपये किंमतीचा विमल पानमसाला, १६ हजार २०० रुपये किंमतीची आरएमडी तंबाखू ३६ हजार रुपये किंमतीची आरएमडी सुपारी, १८ हजार ९०९ रुपये किंमतीची विमल व्ही वन तंबाखू, ६ हजार रुपये किंमतीचा हिरा पानमसाला व ४ लाख रुपये किंमतीची टाटा सुमो गाडी असा एकूण ६ लाख १६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने हा माल करमाळा येथील पांडु ऊर्फ शकील तांबोळी आणि शोएब शकील तांबोळी यांच्याकडून विक्रीस आणल्याची कबुली दिली.
सदरची कारवाईसाठी पोलीस अधीक्षकराकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मागदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/समाधान भाटेवाल, पोहेकॉ/ ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ/आकाश काळे, जालिंदर माने, मयुर गायकवाड व बाळासाहेब गुंजाळ यांच्या पथकांने केली आहे.