अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर शहरात शासकीय तत्रनिकेतन व भवानीनगर परिसरात बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे.
भवानीनगर परिसरातील काही रहिवासी सोमवारी सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी त्यांमधील एका तरुणाला शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेनिक कॉलेज) आवारात एक बिबट्या दिसला. या तरुणाने परिसरातील नागरिक व वन विभागाला ही माहिती दिली. त्यानुसार माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे. भवानीनगर, ढोरवस्ती, डॉटर कॉलनी, बुरुडगाव रोड परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणीही घराबाहेर पडू नये, असा इशारा वन विभागाने दिला आहे.मागील महिन्यात केडगाव उपनगरमध्ये बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घटला होता. यावेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली होती.
दहा पंधरा तासांच्या प्रयत्नानंतर हा बिबट्या जेरबंद करण्यात यश आले होते. ही घटना ताजी असतानाच आता नगर शहरातील भर वस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गामीण भागात बिबट्याचा हल्ला, हौदोस या गोष्टी सातत्याने घडत आहेत. परंतु आता थेट शहरी भागात बिबटयाचा शिरकाव झाल्याने नागरी वस्तीत भीती निर्माण झाली आहे.