पारनेर| नगर सहयाद्री-
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे व प्रतिजेजुरी म्हणून नावलौकिक असणारे पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबाच्या वार्षिक यात्रोत्सवास मंगलस्नान व महापूजेने गुरुवारी पहाटे सुरुवात झाली. २५ जानेवारी ते २७ जानेवारी असा तीन दिवस हा यात्रोत्सव होणार आहे.
गुरुवारी पहाटे चार वाजता गडावर खंडोबाला मंगलस्नान पूजा व चांदीचे सिंहासन आवरण करण्यात आले. सकाळी सहा वाजता आमदार नीलेश लंके यांचे बंधू दीपक लंके व जयश्री लंके यांच्यासह तहसीलदार गायत्री सौंदाणे-गांगुर्डे व दीपक गांगुर्डे यांच्या हस्ते अभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली.
गडावर महापूजा झाल्यानंतर भाविकांसाठी देवदर्शन खुले करण्यात आले. तीन दिवसाच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्री क्षेत्र कोरठण गडावर करण्यात आले आहे. यावेळी देवस्थानच्या अध्यक्षा सौ. शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, सरपंच सौ. सुरेखा वाळुंज, विश्वस्त अॅड. पांडुरंग गायकवाड, राजेंद्र चौधरी, खजिनदार तुकाराम जगताप, सचिव जालिंदर खोसे, कमलेश घुले, अशोक घुले, चंद्रभान ठुबे, सुवर्णा घाडगे, सुरेश फापाळे, रामदास मुळे, महादेव पुंडे, धोंडीभाऊ जगताप, दिलीप घुले, अॅड. संतोष वाळुंज यांच्यासह ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते. कडायाची थंडी असतानाही गुरुवारी सकाळी कुलाचार व कुलधर्म पार पाडण्यासाठी अनेक भाविकांनी गडावर हजेरी लावली. गुरुवारी दुपारी खंडोबाची पालखी मिरवणूक गावात मुक्कामी जाणार असून भव्य छबिना मिरवणूक होणार आहे. शुक्रवारी दुपारी बैलगाडा शर्यती घाटाचे आयोजन पिंपळगाव रोठा ग्रामस्थांच्या व बैलगाडा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
पोनि बारवकर यांच्याकडून आढावा
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबाचा वार्षिक यात्रोत्सवास जवळपास पाच ते सहा लाख भाविक येण्याची शयता देवस्थानने वर्तवली आहे. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी गुरुवारी देवस्थान परिसरातील वाहन तळ व पार्किंग व्यवस्थेसह इतर पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेत चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिले. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने विक्रमी गर्दी होण्याची शयता असल्याने त्या दृष्टीने देवस्थान व पोलिसांनी नियोजन केले आहे.