राहुरी । नगर सहयाद्री
तालुक्यातील शिलेगाव येथे विजय जाधव या आरडगाव येथील तरुणाची हातपाय बांधून मुळा नदीपात्रात असलेल्या एका विहिरीत टाकून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना काल दि. १५ मे रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
मंगळवार दि. १४ मे रोजी आरडगाव येथील विजय आण्णासाहेब जाधव या तरूणाच्या नातेवाईकांना शिलेगाव येथे विजय यास मारहाण झाल्याचे समजले. त्यानंतर नातेवाईकांनी शिलेगाव येथे जाऊन विजय याचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. विजय यास मारहाण करणाऱ्यांच्या घरी गेले असता त्यांना तेथे मारहाण करणारे सुध्दा सापडले नसल्याने नातेवाईकांच्या चिंतेत भर पडली.
काल सकाळी विजयच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात विजयची मिसींग तक्रार दाखल केली. त्यानंतर विजय यास मारहाण करणारा शिलेगाव येथील एक तरुण करपरानदीच्या काटबनात लपून बसल्याची माहिती विजयच्या नातेवाईकांना समजली.त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी सुरवातीला विचारपूस केली त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने विजयचा मृतदेह शिलेगाव येथील मुळानदी पात्रातील विहिरीत असल्याची कबुली दिली. या घटनेतील इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. विजय जाधव याचा खून कोणत्या कारणातून व कोणी केला, हे अद्याप समजू शकलेले नाही.