अहमदनगर। नगर सहयाद्री-
कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाचे सहसचिव डॉ. सुदिन गायकवाड यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश काढला. देशमुख यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी यांच्या मागणीवर वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यास देशमुख हे सक्षम ठरले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
आ. राम शिंदे यांनी शेतीसाठी सीना धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. या मागणीवर कार्यवाही न झाल्याने नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात १२ फेब्रुवारीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठकीत आ. शिंदे हे आक्रमक झाले होते.
कार्यकारी अभियंता देशमुख यांच्याविरुद्ध निलंबनाची मागणी त्यांनी लावून धरली होती. परंतु कारवाई झाली नाही. यामुळे आ. शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर बेमुदत उपोषण आंदोलनाचा करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर देशमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.