श्रीगोंदे / नगर सह्याद्री :
श्रीगोंदे तालुक्यातील कोकणगाव ग्रामपंचायत अंतर्गत शासकीय ठेकेदाराचे बिल देण्यासाठी महिला सरपंचाने लाच घेतली. तिच्या पतीसह महिला सरपंचासही जेरबंद करण्यात आले आहे. सरपंच उज्ज्वला सतीश राजपूत व तिचा पती सतीश बबन रजपूत असे आरोपींचे नावे आहेत.
अधिक माहिती अशी : श्रीगोंदे तालुक्यामधील कोकणगाव ग्रामपंचायत हद्दीत रस्ता दुरुस्ती व संरक्षणभिंत बांधकामाचे ४ लाख ६१ हजार ५६८ रुपयांचे काम शासकीय ठेकेदाराने घेतले होते.
कामकाज पूर्णत्वाकडे असताना कामाचे बिल अदा करण्याचे त्या शासकीय ठेकेदाराने सांगितले. परंतु ही रक्कम देण्याआधी आरोपींची या कामाच्या एकूण बिलाच्या १० टक्के म्हणजे ४६ हजार रुपयांची लाच मागितली. असा प्रकार झाल्याबर त्याने थत लाचलुचपतकडे धाव घेतली. २३ नोव्हेंबर रोजी ही लाच देण्याचे ठरले. त्यानुसार ते आले.
तेथे तडजोड करत ४० हजार रुपये देण्याचे ठरले. त्याचवेळी त्यांना जेरबंद करण्यात आले असून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,
अहमदनगर पोलीस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस अंमलदार,पोना. रमेश चौधरी, पोकॉ. बाबासाहेब कराड, सचिन सुदृक, रवी निमसे, मपोना संध्या म्हस्के, राधा खेमनर, चालक दशरथ लाड यांच्या पथकाने केली.
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास ०२४१- २४२३६७७ किंवा टोल फ्रि क्रं. १०६४ वर संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने यावेळी करण्यात आले.