पारनेर / नगर सह्याद्री : पारनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील व महत्त्वपूर्ण समजल्या जाणारा वारणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच निवडीत राडा झाला. वारणवाडी सरपंच पदी संजय काशिद यांची निवड तहसीलदार गायत्री सौंदाणे व निवडणूक निर्णय अधिकारी अशोक डोळस यांनी जाहीर केली आहे.
तर सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या व पराभूत झालेल्या सदस्याने व महिला सदस्याने या सरपंच निवडीची कागदपत्रे शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या समक्ष फाडले असून मंडलाधिकारी अशोक डोळस यांनी तहसीलदार गायत्री सौंदाणे यांना यासंबंधीची माहिती दिली. त्यानंतर या सरपंच निवडीत बहुमताची ४ मते संजय काशिद यांना मिळाल्याने सरपंच पदी काशिद यांची निवड तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी जाहीर केली आली आहे.
सरपंच संतोष मोरे यांनी दोन महिन्यापूर्वी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पदासाठी संजय काशिद व रोशनी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी डोळस, कामगार तलाठी शरद नांगरे, ग्रामसेवक बाळासाहेब वाळुंज यांच्या उपस्थितीत ही निवडणूक घेण्यात आली. तरी या घडामोडीमुळे वारणवाडी मध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महसूल विभाग गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत ?
वारणवाडीच्या सरपंच पदाच्या निवडीमध्ये सोमवारी राडा झाला असून सरपंच निवडीत पराभव झाल्याने नैराश्यातून शासकीय कागदपत्र फाडली गेली असल्याची माहिती समजली आहे. याचे व्हिडिओ चित्रीकरणही अनेक मोबाईल मध्ये कैद झाले असून महसूल विभाग कागदपत्रे फाडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे महसूल विभाग काय निर्णय घेते याकडेही वानवाडीकरांचे लक्ष लागले आहे.