अहमदनगर । नगर सहयाद्री:-
दारूच्या नशेत लहान भावाने मोठ्या भावाला मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना सावेडी उपनगरातील भिंगारदिवे मळ्यात सोमवारी रात्री घडली. स्वप्निल प्रदीप मुळे (वय 32, भिंगारदिवे मळा, सावेडी) असे मृतकाचे नाव आहे. त्याच्या लहान भावाविरूद्ध शुभम प्रदीप मुळे (भिंगारदिवे मळा, सावेडी) याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
संजय लक्ष्मण सोनवणे (वय 47 रा. भिंगारदिवे मळा, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या भिंगारदिवे मळ्यातील खोलीत स्वप्निल व शुभम हे दोघे राहत होते. त्यांना दोघांंना दारू पिण्याचे व्यसन असल्याने त्यांच्यात नेहमीच वाद होत होते. त्यांच्यात सोमवारी सायंकाळी वाद झाल्याचे फिर्यादीला त्यांच्या मुलाने सांगितले. फिर्यादी यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता स्वप्निल जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले.
त्याला फिर्यादीने विचारणा केली असता शुभमने मारहाण केल्याचे त्याने सांगितले. जखमी स्वप्निल याला फिर्यादी व शुभम यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना काल, मंगळवारी पहाटे दोन वाजता त्याचा मृत्यू झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.