अहमदनगर | नगर सह्याद्री-
नुकत्याच झालेल्या मनपा महासभेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे असणारे पण विरोधी पक्षनेते पदावर असणारे नगरसेवक संपत बारस्कर यांनी व्यापारी कधीपासून गरीब झाला? व्यापारी गरीब असतो का? व्यापारी गरीब झाला म्हणजे आपण (इतर सगळे) भिकारी झालो, असे म्हणत शहरातील सुमारे ४० हजार व्यापारी, दुकानदारांचा अवमान केल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे यांनी व्यापार्यांनी पैसे भरलेच पाहिजेत, असं म्हणत परवाना शुल्क वसुलीसाठी सभागृहात आग्रह धरला. यावरून काँग्रेसने आडते बाजार, दाळ मंडई येथे राष्ट्रवादीच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा बोलविता धनी कोण आहे हे नगरकरांना माहित आहे, असा घाणाघात यावेळी बोलताना काळे यांनी केला.
यावेळी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, विलास उबाळे, सुनील क्षेत्रे, अलतमश जरिवाला, गणेश चव्हाण, राहुल सावंत आदींसह काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी व्यापार्यांचा अवमान करणार्या राष्ट्रवादी गद्दार गटाचा निषेध असो, व्यापार्यांवर व्यावसायिक परवाना शुल्क वसूली लादणार्या राष्ट्रवादी गद्दार गटाचा धिक्कार असो या घोषणांनी बाजारपेठेचा परिसर दणाणून गेला होता.
शहर काँग्रेसने सभागृहातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकांच्या व्यापारी विरोधी वक्तव्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यामुळे व्यापारी, दुकानदारांसह मुख्य बाजारपेठे, सावेडी, केडगाव उपनगरातील व्यावसायिक यांच्यामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
४० हजार व्यावसायिकांच्या पाठीशी उभेराहणार नसले तरी देखील शहर काँग्रेस व्यापार्यांचा हात सोडणार नाही. ज्या पद्धतीने रेल्वे माल धक्क्यावरील माथाडी कामगारांना गेल्या अनेक वर्षांपासूनचे थकीत कोट्यावधी रुपयांचे वेतन मिळवून देण्यासाठी काँग्रेसने यशस्वी लढा लढला त्याचप्रमाणे व्यापार्यांना देखील या जाचक वसुलीतून सुटका मिळवून देण्याचे काम शहरात काँग्रेस नक्की करेल, असा विश्वास यावेळी बोलताना काळे यांनी व्यक्त केला.