40 वर्षांनंतर वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविण्याचा बहुमान
अहिल्यानगर / नगर सह्याद्री
पालघर येथे झालेल्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनद्वारे आयोजित वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वरिष्ठ महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावला आहे. तब्बल 40 वर्षांनंतर संघाने ही कामगिरी केली आहे.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात अहिल्यानगरने दमदार खेळी करुन यवतमाळवर 4-0 अशी एकतर्फी मात केली. स्पर्धेत या आधी संघाने सातारा वर 6-1, लातूर वर 3-0 आणि गोंदिया वर 4-0 असा दमदार विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली होती. उत्कृष्ट एकजूट, आक्रमक खेळ आणि भक्कम बचावामुळे संघाने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अहिल्यानगर संघात राणी कदम (कर्णधार), प्रियंका आवारे, सोनिया दोसाणी, निकिता भिंगारदिवे, आयेशा सय्यद, श्रेया कावरे, सूर्या नयना, महिमा पाथरे, सुमैय्या शेख, तनिशा शिरसूळ, वैष्णवी रोकडे यांचा समावेश होता. संघ प्रशिक्षक म्हणून शशांक वाल्मिकी व संघ व्यवस्थापक म्हणून काजल वाल्मिकी काम पाहिले.
अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, अमरजितसिंह शाही, जोगासिंग मिन्हास, खालिद सय्यद, सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव, व्हिक्टर जोसेफ, खजिनदार रिशपालसिंग परमार, सहाय्यक खजिनदार रणबीरसिंग परमार, डॉ. सॅवियो वेगास सर्व पदाधिकारी व सदस्यांनी संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले.
ही ऐतिहासिक कामगिरी जिल्ह्यातील फुटबॉल खेळाला चालना व नवी दिशा देणारी ठरणार आहे. हा विजय सर्व खेळाडूंसाठी प्रेरणादायी बनला असून, यापुढे संघाकडून आनखी अपेक्षा वाढल्या आहेत. जिल्हा फुटबॉल संघटना फुटबॉल खेळाच्या विकासासाठी व खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करुन त्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी कार्यरत आहे. संघाची ही कामगिरी जिल्ह्याच्या दृष्टीकोनाने अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार सचिव रोनप फर्नांडिस यांनी काढले.
अहिल्यानगर महिला फुटबॉल संघाचे शुक्रवारी (दि.15 ऑगस्ट) रात्री उशीरा आगमन झाले. यावेळी जिल्हा फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष खालिद सय्यद, सहसचिव प्रदीप जाधव, सदस्य राजू पाटोळे, पल्लवी सैंदाणे, जेव्हिअर स्वामी, खेळाडूंचे पालक व शहरातील फुटबॉल प्रेमी यांनी खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केले. जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने सर्व खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सन्मान स्विकारताना भारावून गेलेल्या खेळाडूंनी पुढील वर्षीच्या स्पर्धेमध्ये आणखी मेहनत घेऊन जिल्ह्यासाठी विजेतेपद मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. तर जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे देण्यात आलेल्या संधी आणि सोयी-सुविधाबद्दल खेळाडूंनी कृतज्ञता व्यक्त केली.