अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
पती-पत्नीचा किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर पत्नी रागाच्या भरात घरातून बाहेर निघून गेल्याने निराश झालेल्या पतीने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 16 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील गुहा येथे उघडकीस आली. गणेश शिवाजी अदमाने (वय 34) रा. ऊरुली देवाची, ता. हवेली, पुणे, असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. गणेश अदमाने हा गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात असलेल्या साई सुंदर हॉटेल येथे वेटर म्हणून काम करत होता.
तसेच तो त्याची पत्नी व मुलांसह हॉटेल मागील एका खोलीत राहत होता. रात्रीच्या दरम्यान गणेश अदमाने याचे किरकोळ कारणावरून पत्नीशी वाद झाले होते. त्यानंतर रागाच्या भरात पत्नी घरातून बाहेर निघून गेली. तेव्हा गणेश अदमाने यांनी हॉटेल मागील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना 16 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण बागुल यांनी घटनास्थळी धाव घेतली.
गणेश अदमाने यास रुग्णवाहिकेतून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. मयत गणेश अदमाने यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास राहुरी पोलीस पथकाकडून सुरू आहे.