श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील एका नामांकित पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर तिच्याच महाविद्यालयातील शिक्षकाने वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
तक्रारीनुसार, शिवाजी नवले (वय २९, रा. भानगाव, ता. श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव असून, त्याने जानेवारी २०२५ ते १२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पीडितेला विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचे समोर आले आहे. हे अत्याचार श्रीगोंदा शहरातील काही लॉज, हॉटेल, तसेच कॉलेजच्या प्रयोगशाळेतील बाथरूम आणि इतर ठिकाणी केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.
पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही आरोपीने संबंध ठेवले, हे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे. शिक्षकासारख्या जबाबदार पदावरील व्यक्तीकडून घडलेली ही कृती अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक गणेश आहेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नितीन घाडगे तपास करत आहे.