अहिल्यानगर | नगर सह्याद्री
आतुरतेने वाट पाहत असलेल्या लाडक्या बाप्पाचे घरोघरी, गणेश मंडळांमध्ये मोठ्या थाटात अन जल्लोषात आगमन झाले. ढोल ताशांच्या गजरात अन गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषाने आसमंत दुमदुमला. अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते बुधवारी सकाळी अत्यंत धार्मिक वातावरणात श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना विधीवत पार पडली. मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गद झाली होती. फुअलांनी व विद्युत रोषणाईने सजवलेल्या मंदिरात या वेळी सर्वत्र भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या सोहळ्यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडित खरपुडे, सचिव अशोक कानडे, देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज, विश्वस्त पांडुरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, बापूसाहेब एकाडे, चंद्रकांत फुलारी, विजय कोथिंबिरे, हरीचंद्र गिरमे, ज्ञानेश्वर रासकर, प्रा. माणिक विधाते, संजय चाफे, नितिन पुंड यांच्यासह श्री विशाल गणेश सेवा मंडळाचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले की, अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत म्हणून विशाल गणेशाची ओळख केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक एकतेचे प्रतिक आहे. मंदिरात होत असलेले कार्यक्रम ही भाविकांना एकत्र आणणारी आणि समाजाला सकारात्मक दिशा देणारी पर्वणी आहे. ते पुढे म्हणाले की, गणेशोत्सवाच्या काळात शिस्त, सुरक्षा आणि स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे. भक्तांनी शांततेत आणि आनंदात सण साजरा करावा. पोलिस विभाग नेहमी समाजाच्या सोबत उभा आहे.
देवस्थानचे अध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी यांनी सांगितले कि ग्रामदैवत श्री विशाल गणेश हे अहिल्यानगरकरांचे आस्थेचे केंद्र आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मिळालेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही श्रींच्या कृपेची प्रचिती आहे. समाजाच्या सर्व घटकांनी एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात व एकतेने साजरा करावा, हेच श्रींचे खरे आशीर्वाद मानले जातील. गणेशोत्सवानिमित्त श्री विशाल गणेश देवस्थान ट्रस्टतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रुद्रवंश ढोल पथकाने आपली कला सादर केली. मंदिर परिसरात फुलांच्या सजावटीसोबतच विद्युत रोषणाईने सजवलेली कलाकृती विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. महिला व युवक मंडळांनी स्वयंसेवक म्हणून व्यवस्था सांभाळली. संपूर्ण परिसरात गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.