अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने छापेमारी करत ३८ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. बिंगो, जुगार, दारु विक्रेत्यावर कारवाई करत ४३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्ह्यात वाढणाऱ्या अवैध धंद्यांना चाप बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खर्डा, शेवगाव आणि अहिल्यानगर शहरात एकाच दिवशी धडक कारवाई केली आहे.
पहिल्या कारवाईत एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील लोहगाव येथून बिंगो जुगारप्रकरणी अभिषेक बाळासाहेब खाडे (वय २५, रा. लोहगाव, ता. नेवासा) या युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून जुगार खेळण्याचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 23 हजार 270 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत शेवगाव पोलीस ठाणे हद्दीत विनापरवाना देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून 63 हजार 955 रुपये किमतीची दारू जप्त केली असून, दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी कारवाई खर्डा पोलीस ठाणे हद्दीतील जातेगाव शिवारातील निपाणी फाट्याजवळ चालणाऱ्या तिरट जुगार अड्ड्यावर केली. या कारवाईत एकूण 40 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, 37 लाख 33 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकातील पोउपनि/समीर अभंग, पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, शामसुंदर गुजर, मोहन साखरे, अमोल आजबे, प्रकाश मांडगे यांचे पथक तयार करुन खर्डा पोलीस ठाणे हद्दीमध्ये, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, रिचर्ड गायकवाड, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, महादेव भांड, भाग्यश्री भिटे यांनी बजावली आहे.