अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातुन हद्दपार केलेला सराईत गुन्हेगाराला शिवजयंती मिरवणुकीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. सुनिलसिंग जीतसिंग जुन्नी ( रा. काटवनखंडोबा, अहिल्यानगर ) असे त्याचे नाव आहे. त्याचेविरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शिवजयंती उत्सव शांततेमध्ये साजरा व्हावा यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्याविरूध्द कारवाई करण्याबाबत आदेश दिलेे होते. त्या अनुषंगाने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/थोरात व पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश लोंढे, गणेश धोत्रे, रविंद्र घुंगासे, शाहीद शेख, पंकज व्यवहारे, जालींदर माने, सागर ससाणे, रोहित येमुल, विशाल तनपुरे, भाग्यश्री भिटे व ज्योती शिंदे अशांचे पथक नेमले.
त्यांना शिवजयंती मिरवणुक बंदोबस्तात हद्दपारआरोपी मिळून आल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पथकाला गुप्तबातमीदारा मार्फत हद्दपार असलेला सुनिलसिंग जुन्नी शिवजयंती मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने शिवजयंती मिरवणुकीमधून त्याला ताब्यात घेतले. त्याचेविरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहे.