अहिल्यानगर:- नगर सहयाद्री:-
कर्जत पोलिस स्टेशनच्या लॉकअपचे गज कापून आणि छतावरील कौले हटवून सन 2020 मध्ये फरार झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपींना अखेर पाच वर्षांनंतर पुण्यातून अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने बुधवारी (दि. 13 ऑगस्ट) गुप्त माहितीच्या आधारे पुणे जिल्ह्यातील फुलगाव एमआयडीसी परिसरातून त्यांना ताब्यात घेतले.
अटक केलेल्यांची नावे अक्षय रामदास राऊत (28) आणि चंद्रकांत महादेव राऊत (30, दोघेही रा. पारवाडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर) अशी आहेत. 2018 मध्ये मुंबईतील टरबूज व्यापारी हसन उमर शेख यांच्या खुनाच्या गुन्ह्यात या दोघांची अटक झाली होती. 10 फेब्रुवारी 2020 रोजी कर्जत पोलीस स्टेशनच्या लॉकअपमधून अक्षय राऊत, चंद्रकांत राऊत आणि त्यांचे तीन साथीदारांनी लॉकअपच्या छताचे लोखंडी गज कापून, कौले काढून पलायन केले होते. या घटनेने त्या काळी मोठी खळबळ उडवली होती. त्यानंतर इतर आरोपींना अटक झाली, मात्र हे दोघे पाच वर्षांपासून फरार होते.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकात हृदय घोडके, बाळासाहेब नागरगोजे, सागर ससाणे, रोहित येमुल, प्रशांत राठोड, अरुण मोरे आदींचा समावेश होता. या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पुणे जिल्ह्यातील फुलगाव एमआयडीसी परिसरात छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना आता कर्जत पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.