अहिल्यानगर ।नगर सहयाद्री
जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे सामाईक विहिरीतून पिण्यासाठी पाणी घेतल्याच्या कारणावरून पती-पत्नीला लाकडी काठ्या आणि विटांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. या घटनेत आरोपींनी त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचाही फोडल्या. या प्रकरणी शीतल भरत कुलथे (वय ३५) यांच्या तक्रारीवरून कर्जत पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (६ मे २०२५) सायंकाळी घडली.
दूरगाव येथील शीतल भरत कुलथे आणि त्यांचे पती भरत कुलथे यांच्या घरात दोन दिवसांपासून पाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी गट नंबर ६०३ मधील सामाईक विहिरीतून पिण्यासाठी पाणी घेतले. याच वेळी शरद नारायण कुलथे तिथे आले आणि त्यांनी भरत कुलथे यांना विहिरीचे पाणी न घेण्यास सांगितले. त्यांचे म्हणणे होते की, विहिरीतील पाणी शेतातील उसाला देण्यासाठी आवश्यक आहे. यावर भरत यांनी स्पष्ट केले की, ते केवळ पिण्यासाठी पाणी घेत आहेत, शेतीसाठी नाही. तरीही शरद कुलथे यांना राग अनावर झाला. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शरद कुलथे यांनी काही जणांना सोबत घेऊन चारचाकी वाहनातून कुलथे दाम्पत्याच्या घरी धडक दिली आणि त्यांना मारहाण सुरू केली.
शरद कुलथे आणि त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तींनी शीतल आणि भरत कुलथे यांना लाकडी काठ्या, लाथा-बुक्क्यांनी आणि विटांनी मारहाण केली. यात शीतल यांच्या डोक्यावर विट लागल्याने आणि भरत यांनाही गंभीर दुखापत झाली. दोघेही या हल्ल्यात जखमी झाले. याशिवाय, आरोपींनी कुलथे यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडून मालमत्तेचे नुकसान केले. या हल्ल्यामुळे कुलथे दाम्पत्याला शारीरिक आणि मानसिक धक्का बसला. शीतल कुलथे यांनी तातडीने कर्जत पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून ओम शरद कुलथे, साई शरद कुलथे, शरद नारायण कुलथे आणि सुधीर रावसाहेब मैड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.