अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अकोले तालुक्यातील तिरडे आश्रमशाळेत विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षक आणि त्याला मदत करणार्या शिक्षिका, मुख्याध्यापिकेसह शिपायाविरोधात अकोले पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित विद्यार्थिनी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून वसतिगृहात राहण्यास आली असताना त्यावेळी आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असताना शिक्षक धुपेकर (पूर्ण नाव माहित नाही) हे तासिका संपल्यानंतर वर्गात यायचे व सतत तिच्यासह मैत्रणींसोबत बोलण्याचा प्रयत्न करायचे. एकेदिवशी जेवणाची सुट्टी झाली असताना धुपेकर वर्गात आले व पीडिता मैत्रिणींसह बाकावर बसलेल्या असताना ते तिला म्हणाले, काय करत आहेस? त्यानंतर बोलणे टाळण्याकरीता ती दुसर्या बाकावर जाऊन उभी राहिली असता धुपेकर यांनी गैरकृत्य केले, तसेच तिची मैत्रीण (वय 17) तिच्याशीही गैरकृत्य करत दुसर्या मुलीस बोलेले की माझे पाठ खाजवून दे व हात पाय दाबून दे. त्यानंतर सर्वांनी मिळून मुख्याध्यापिका कुलथे यांच्याकडे जाऊन सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यावेळी त्या म्हणाल्या, तुम्हाला माझी शपथ आहे घरी हा प्रकार सांगू नका. त्यानंतर धुपेकरांची दुसर्या शाळेत बदली झाली.
याचबरोबर गभाले यांची पत्नी गभाले या नेहमी मुलांच्या नावाने चिडवून त्रास देत असे. त्यानंतर ती नववीमध्ये शिक्षण घेत असताना जेव्हा जेव्हा शाळेच्या आवारात तसेच वसतिगृहात फिरत असताना साफसफाई कामगार धांडे मामा (पूर्ण नाव माहित नाही) पाठलाग करायचे व कपडे धूत असताना देखील जवळ उभे राहायचे. असे प्रकार सारखेच सुरु झाल्याने पुन्हा घडलेला सर्व प्रकार मुख्याध्यापिका कुलथे यांना सांगितला असता त्या म्हणाल्या की, जर झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुम्हाला शाळेतून काढून टाकू अशी धमकी दिली.
हा सर्व प्रकार घरी सांगितला तर घरचे बोलतील या भीतीमुळे कोणतीच घटना घरी सांगितली नाही. त्यानंतर मे उन्हाळ्याच्या सुट्टीत धांडे मामा यांची देखील बदली झाली. तेव्हा दहावीला गेल्यानंतर मुख्याध्यापिका तिला सतत कोणत्या न कोणत्या कारणावरुन बोलू लागल्या व मानसिक त्रास देवू लागल्या. सदरचा मानसिक त्रास सहन न झाल्याने आश्रमशाळेतील मोबाईल फोनवरुन आईला कॉल केला व गेल्या 2 वर्षांपासून घडलेला सर्व प्रकार आई-वडीलांना सांगितला. पालक व संबंधित पीडित मुली पोलिस ठाण्यात आल्या. त्यांनी दिलेल्या जबाबावरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.