Agristack Scheme: केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि शेतीच्या क्षेत्रातील आधुनिकतेसाठी ‘ॲग्रीस्टॅक’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक ओळख क्रमांक (फार्मर आयडी) प्रदान केला जातो. या डिजिटल ओळख क्रमांकामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज, अनुदान, विमा आणि इतर शेतकऱ्यांसाठी असलेल्या सरकारी योजनांचा अधिक सोप्या पद्धतीने लाभ घेता येईल.
‘ॲग्रीस्टॅक’ योजना शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल ओळखपत्र प्रणाली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळणार आहे, ज्यामुळे अनुदान प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होईल.
योजनेचे मुख्य फायदे:
थेट बँक खात्यात फायदा: पीएम किसान सन्मान निधी, पीक विमा, नैसर्गिक आपत्ती मदत आणि इतर सरकारी योजनांचा फायदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. यामुळे मध्यस्थांची गरज नाहीशी होईल आणि शेतकऱ्यांना सुविधा मिळवण्यात होणारा वेळ कमी होईल.
कागदपत्रांची कमी: शेतकऱ्यांना पीककर्ज, विमा आणि अन्य सरकारी मदतीसाठी वेगवेगळी कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही. युनिक फार्मर आयडी हेच शेतकऱ्यांचे प्रमुख ओळखपत्र असेल, ज्यामुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होईल.
विविध शेतकरी योजना: खत, बियाणे, औषधे यांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ थेट मिळेल.
ताज्या हवामानाची माहिती: हवामान अंदाज, मृदा परीक्षण, सिंचन योजना यासंबंधी माहिती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होईल.
नैसर्गिक आपत्ती मदत: दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये होणारे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांची माहिती आधीच सरकारकडे उपलब्ध असेल, त्यामुळे मदतीची प्रक्रिया जलद होईल.
नोंदणी प्रक्रिया:शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी गावागावात शिबिरे आयोजित केली जात आहेत. नोंदणी प्रक्रिया कृषी, महसूल आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त पथकाद्वारे केली जात आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक
सातबारा उतारा (७/१२)
नोंदणी पूर्णतः मोफत आहे, आणि शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता लवकर नोंदणी करून घ्यावी.