अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
गेल्या आठ दिवसांत दोनदा झालेल्या अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, याची दखल घेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा करत शेवगाव व पाथड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची शेतीच्या बांधांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्यासोबत आ. संग्राम जगताप, आ. मोनिका राजळे देखील उपस्थित होत्या.
त्यांनी भागातील नुकसानीची माहिती कृषीमंत्र्यांसमोर मांडली. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात दोन वेळा झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी, मका, आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक पाहणीनुसार, 2 लाख 30 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कृषीमंत्री भरणे यांनी बुधवारी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेटी दिल्या, शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.
त्यांनी अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे पूर्ण करून मदतीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. शेवगाव, पाथड, नगर, नेवासा आणि अकोले तालुक्यांमध्ये दोन वेळा झालेल्या जोरदार पावसामुळे शेतातील उभे पीके वाया गेले आहे. काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे अनेकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.