Maharashtra Crime News: काल संध्याकाळी स्मशानभूमीत अघोरी पूजेचा प्रकार उघड झाला. चार अज्ञात व्यक्तींच्या फोटो, काळी बाहुली, लिंबू-मिरची, कवाळ आणि गुलाल लावलेली पूजेची मांडणी पाहून सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वासुंबे गावातील गावकरी हादरले.
या भयावह दृश्याने गावकऱ्यांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण केली आहे. गावकऱ्यांनी तासगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी घटनास्थळाचा तपास सुरू केला आहे.
सद्यस्थितीत कोणत्या व्यक्तींचे फोटो आहेत किंवा या अघोरी पूजेचा नेमका हेतू काय आहे, याची माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी साक्षीदारांची चौकशी सुरू केली असून, पुढील तपासातून या रहस्यमय प्रकरणाचा खुलासा होण्याची अपेक्षा आहे.
गावकऱ्यांमध्ये या प्रकारामुळे मोठा संशय आणि भयाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासन घटनास्थळाची सुरक्षा वाढवण्यासाठी दक्षता घेत आहे.



