अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महेश सुभाष पेद्राम यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या दुकानासमोर रात्रीच्या वेळेस संशयितरित्या अघोरी साहित्य आढळल्याने संपूर्ण कुटुंब भयभीत झाले आहे.
महेश पेद्राम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २ जुलै रोजी रात्री ११.५० ते १२.१५ या दरम्यान “फॅशन मेकर्स लेडीज टेलर्स” या त्यांच्या दुकानासमोर एका व्यक्तीने अंडी, लिंबू, काळी बाहुली, हळद, मिरची व त्यावर कुटुंबातील सदस्यांची नावे लिहून अघोरी पूजा केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित व्यक्ती ओळखीची असल्याचे सांगितले आहे.
संबंधित व्यक्तीने याअगोदरही कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे त्यांनी म्हण्टले आहे. यावेळीही त्याने अघोरी कृती करत जाणीवपूर्वक त्रास दिला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यासोबतच त्यांनी सीसीटीव्ही फुटेजवरील छायाचित्रे पुरावा म्हणून जोडली आहेत. या प्रकरणी (जादूटोणा प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.