अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे पशुधन बळी जात आहे. आता बिबट्याने माणसांनाही लक्ष करण्यास सुरूवात केली आहे. अशीच एक घटना 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास राहुरी तालुक्याती ताहाराबाद येथे घडली आहे.
बिबट्याने रुद्र सचिन गागरे या 5 वर्षाच्या बालवाडीत शिकणार्या चिमुरड्यावर हल्ला केला. मात्र, वडिलांनी आपल्या मुलाची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. या हल्ल्यात रुद्र गागरे हा गंभिर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सचिन शामराव गागरे हे आपल्या दुचाकीवरून बाजार करून घरी आले असता त्यांचा अंदाजे 5 वर्षाचा मुलगा रुद्र हा अंगणात खेळत होता.
वडील बाजाराहून आल्याने रूद्र हा वडीलांच्या दुचाकीकडे धावत आला. याचवेळी बिबट्याने रूद्र याच्यावर झेप घेतली. यावेळी सचिन गागरे यांनी मोठी हिम्मत दाखवून आपला मुलगा रूद्र याला बिबट्याच्या तावडीतून सोडविले. आरडाओरड केल्यानतंर बिबट्याने तेथून काढता पाय घेतला.
या हल्ल्यात रुद्र याच्या पाठीला व पायाला बिबट्याने गंभिर स्वरूपाच्या जखमा केल्याने रूद्र याला तातडीने ताहाराबाद येथील ग्रामिण रुग्णायलात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून अहिल्यानगर येथील जिल्हा ग्रामिण रुग्णालयात पुढिल उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.