अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शेअर मार्केट ट्रेडिंग नावाखाली अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा बिगबुल साईनाथ कवडे यास अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरात येथून ताब्यात घेतले आहे. चौकशी करुन त्यास पुढील तपासासाठी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.
सुमारे चार वर्षापूर्वी साईनाथ कवडे याने शेवगाव तालुक्यातील रावतळे कुरुडगाव येथील शेतात, शेअर मार्केट ट्रेडिंग कार्यालय सुरु केले होते. यावेळी केलेल्या गुंतवणुकीवर १२ ते २० टक्के मासिक परतावा दिला. त्याच्या या अमिषाला बळी पडून अनेकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. परतावा मिळतं असल्याने अनेक जण आकर्षित झाले. मोठ्या प्रमाणात मिळणारा परतावा, यातून अनेकांनी कामधंदा सोडून मिळणाऱ्या पैश्यावर मौज मजा सुरु केली.
या व्यवसायात मिळणारा पैसा पाहून अनेक लोक आकर्षित होत होते. शेतातील धनधान्य, दागदागिने, विविध बँक, पतसंस्था मधील ठेव पावत्या मोडल्या. अनेकांनी रानात काय उत्पन्न नाही, म्हणतं वावर विकले, काहींनी शेत गहाण ठेवलं, तर काहींनी आगामी काळात प्लॉटचे दर वाढणार नाहीत अशी स्वतःची समजूत काढून प्लॉट विकले. तसेच नोकरदार वर्ग, बचत गटांनी सोसायटी, बँकांचे कर्ज काढून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली.
गुंतवणुक करण्यासाठी कवडेच्या कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांच्या रांगा लागल्याचे चित्र बघायला मिळत होते. पैश्याने भरलेल्या पिशव्या, बॅग, घेऊन गुंतवणूकदार नंबर कधी येईल याची वाट बघत ताटकळत उभे राहत होते. नंबरला उभा राहिलेल्या लोकांची गर्दी हे नित्याचे चित्र होते. नंबर आल्यावर कार्यालयात बसलेल्या संबंधित युवकांच्या हातात पैसे हवाली केल्यावर, त्याबदल्यात एका चिठ्ठी वर दिलेली रक्कम, नावाचा उल्लेख असलेला कागद हातात थोपवला जात होता. हे सर्व घडत असताना विविध यंत्रणा बघ्याची ठाम भूमिका घेऊन जे सुरु आहे, त्याकडे पाहात होत्या.
प्रशासकीय यंत्रणेतील अनेक अधिकारी आणि कर्मचारी, व्यापारी, शेतकरी व्यावसायिक, नोकरदार वर्ग, छोटे व्यावसायिक, हातावर पोट भरणारे या अमिषाला बळी पडले. इतकेच काय पोलीस, महसूल, वीज महामंडळ, शिक्षक देखील या मोहजाळात अलगद अडकले.
हे सर्व घडत असताना, अचानक चर्चेत आलेल्या कवडेचा रुबाब पाहून, अनेक युवक या व्यवसायात उतरले. अनेकांनी गावागावात शेअर मार्केट ट्रेडिंगची कार्यालय थाटली गेली. अन् सर्वाधिक गुंतवणूक खेचून आणण्याची स्पर्धा सुरु झाली, कोण व्याजदर जास्त देतो, त्याकडे गुंतवणूकदार वळत असल्याचे दिसत होते. या स्पर्धेतून काहींनी थेट २८ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले. केवळ सात ते आठ महिन्यात पैसे दुप्पट होत असल्याचे पाहून गुंतवणूकदारांची संख्य मोठ्या प्रमाणात वाढली.
साई कवडे याच्याकडील महागड्या आलिशान गाड्या, घड्याळ, मोबाईल, त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेली खाजगी सुरक्षा रक्षक टोळी, एका मागे एक दहा ते पंधरा गाड्यांचा ताफा, हे सर्व चित्र दाक्षिणात्य चित्रपटाला साजेसे होते. दरम्यान, शेवगाव तालुक्यात शेअर मार्केट व्यवसाय हा प्रचंड तेजीत आला. यातून अनेकांना भरमसाट पैसे मिळाले. त्यातील काहींनी ते पैसे पुन्हा त्याच्या कडे गुंतवणूक केली, तर काहींनी कामधंदा सोडून मौज मजा सुरु केली.
छोट्या मोठ्या दुकानात काम करण्यासाठी कामगार मिळणे दुरापास्त झाले होते. सुशिक्षित बेरोजगार युवक संघटीत होऊन, पैसे गोळा करुन ठराविक रक्कम गुंतवणूक करत होते. दुसरीकडे बाजारपेठेतील व्यवहार जवळपास ठप्प झाल्याचे दिसून येत होते. सोनार व्यावसायिक, जमीन प्लॉट खरेदी विक्री व्यवहार मंदावले होते. या दरम्यान, शेअर मार्केट ट्रेडिंग कार्यालयांची संख्येने शंभरी पार केली होती. हा व्यवसाय प्रचंड तेजीत आला होता. शेवगाव सह आसपासच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील लोक गुंतवणूक करण्यासाठी शेवगावात दाखल होत होते.
दरम्यानच्या काळात काही ट्रेडिंग करणारे ट्रेडर्स अनेकांचे पैसे घेऊन पळून गेले. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी शेवगाव पोलीस ठाण्यात लोक चकरा मारत होते. परंतु येथील तत्कालीन पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे हे मात्र गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करीत होते. आपली फसवणूक झाली आहे हे नागरिकांना समजल्यानंतर अनेकांनी पोलीस ठाणे समोर संताप व्यक्त करत, आंदोलने केली. या सर्व गोष्टीची दखल घेत आमदार मोनिका राजळे यांनी विधान सभेमध्ये अधिवेशनाच्या वेळी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली.
गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु होताच, साई कवडे हा अनेकांचे पैसे हडप करुन फरार झाला. साई कवडे तसेच त्याची इतर साक्षीदार त्यांना अटक व्हावी. या मागणीसाठी फसवणूक झालेल्या अनेक गुंतवणूकदारांनी शेवगाव पोलीस ठाण्यासमोर साखळी आंदोलन केले. यावेळी, लवकर अटक करु असे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी आश्वासन दिले. मात्र कवडे यास अटक झाली नाही. मागील आठवड्यामध्ये पोलीस अधीक्षक राकेश ओला हे शेवगाव येथे आले असता, संबंधित गुंतवणूकदारांनी ओला यांची भेट घेऊन, त्यांच्यासमोर व्यथा मांडली. यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांना सूचना करत तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकाची स्थापना करुन शोध घेतला असता कवडे गुजरात राज्यात मिळून आला आहे.
यासर्व घडामोडीत शेवगाव तालुक्याचे अर्थकारण ढासळले असून अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असल्याने याप्रकरणी एसआयटी, अथवा ईडी मार्फत तपास व्हावा अशी मागणी जोर धरत आहे.