मुंबई / नगर सह्याद्री –
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आरोपींसंदर्भात अनेक खुलासे केले आहेत. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप करत पुरावे सादर केले आहेत. ४ फेब्रुवारीला अंजली दमानिया यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या घोटाळ्यांचा पुराव्यासकट पाढाच वाचला. धनंजय मुंडे यांनी एका वर्षात अफाट पैसे खाल्ले असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अंजली दमानिया यांनी अनेक दावे करत खळबळजनक आरोप केले आहेत. डिबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे मिळणार होते. यासाठी बजेट ठरलं होतं. पण उत्पादनांच्या किंमती जास्त दाखवून कमी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलं असल्याचा खुलासा दमानिया यांनी केला आहे.
मुंडे कृषीमंत्री असताना नॅनो युरिया, नॅमो डीएपी आणि फवारणी पंपाच्या खरेदीत २७५ कोटींचा घोटाळा केला असल्याचा खुलासाही दमानिया यांनी केलाय. नॅनो युरियाची बॉटलला ९२ रूपये लागतात. पण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं. तेव्हा २२० रूपयांना बॉटल घेतली. तेव्हा १९ लाख ३८ हजार ४०८ बॉटल २२० रूपयांमध्ये खरेदी केली. म्हणजेच दुपटीपेक्षा जास्त किंमतीनं बॉटल घेतल्या असल्याचा आरोप दमानिया यांनी केला. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याची माहिती दिली.
तसेच गोगलगायी निर्मुलनाचं औषधही अव्वाच्या सव्वा दरानं खरेदी केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. एकेक बॅटरी स्प्रेअरमध्ये त्यांनी पैसे लाटले. ५० कोटींचे डिलरशीपचे नियम देखील बदलण्यात आले. कापूस साठवणुकीच्या बॅग खरेदीत ४२ कोटींचा घोटाळा केलाय. धनंजय मुंडे यांनी वर्षभरात अफाट पैसे खाल्ले असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.
भगवान गडावर जाऊन पुरावे सादर करणार
धनंजय मुंडे यांनी केलेले घोटाळे पुराव्यासकट भगवान गडावर दाखवणार असल्याचं दमानिया यांनी सांगितलं. नम्रपणे सर्व पुरावे दाखवणार आणि धनंजय मुंडे यांना दिलेला पाठिंबा मागे घेण्याची विनंती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी करावी, अशी विनंती करेन, असंही अंजली दमानिया म्हणाले.