बेकायदेशीर उत्खननावर कारवाई
श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) आणि शिरूर (जि. पुणे) तालुक्यांच्या सीमेवर प्रशासनाने मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी मोठी संयुक्त मोहीम राबवत बेकायदेशीर वाळूउत्खननावर धडक कारवाई केली. श्रीगोंदा तालुक्यातील माठ व शिरूर तालुक्यातील शिंदोडी परिसरातील नदीपात्रात सुरू असलेल्या अनधिकृत उत्खननासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवर कारवाई करत ६ फायबर बोटी आणि ७ सक्शन बोटी अशा एकूण १३ बोटींचा नाश करण्यात आला.
नदीपात्राची होत असलेली हानी आणि पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन केलेल्या या मोहिमेला प्रशासनाचा कठोर इशारा मानले जात आहे. अनेक वर्षांपासून चालू असलेले अनधिकृत उत्खनन स्थानिक प्रशासनासाठी डोकेदुखीचे कारण बनले होते. अखेर दोन्ही तालुक्यांच्या प्रशासनांनी पुढाकार घेत संयुक्त पथकाच्या माध्यमातून स्पष्ट संदेश दिला की, बेकायदेशीर उत्खनन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही.
या कारवाईदरम्यान श्रीगोंदा येथील २ मंडळ अधिकारी, १२ तलाठी आणि कोतवाल यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. नदीपात्रात सापडलेल्या बोटी जप्त करण्याऐवजी थेट नष्ट करण्याचा निर्णय म्हणजे प्रशासनाची ठाम भूमिका अधोरेखित करणारा ठरला. बेकायदेशीर उत्खननामुळे नदीपात्र खोल जाणे, तीर ढासळणे, पाण्याची पातळी घटणे आणि पुराचा धोका वाढणे यांसारखे गंभीर परिणाम दिसून येतात.
याविरोधात पर्यावरणवादी संस्था आणि स्थानिक नागरिक अनेक दिवसांपासून आवाज उठवत होते. त्यांच्या मागण्यांना अखेरीस मिळालेला हा सकारात्मक प्रतिसाद सर्वत्र स्वागतार्ह ठरत आहे. तथापि, एकदाच केलेली कारवाई पुरेशी ठरणार नाही. सातत्याने पहारा, तंत्रज्ञानाचा वापर, स्थानिकांचे सहकार्य आणि कडक कारवाई यांची जोड मिळाल्यासच नदीपात्राचे संरक्षण होईल असे नागरिक बोलत आहे.



