अंतरवाली सराटी / नगर सह्याद्री
अंतरवाली सराटी येथे होणारी (ता. 29) रोजीची निर्णायक बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. सरकारने विधानसभेच्या निवडणुका चार महिने पुढे ढकलल्या आहेत. राज्यात कोणती आपत्ती नाही किंवा मोठे असे कारण नाही, तरीही काही कारण नसताना विधानसभा निवडणूक चार महिने पुढे ढकलली असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज, बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार, लाठी हल्ला, राज्यात मराठा समाज, धनगर समाजाचे आरक्षणाकरिता होत असलेले आंदोलन, मोठे समाज सत्ताधारी सरकारच्या विरोधात आहेत. या घटनांची सत्ताधारी सरकारला भीती वाटत आहे, त्यामुळे सरकारने भीतीपोटी आणि निवडणुकीमध्ये फटका बसणार या कारणाने निवडणूक पुढे ढकलली आहे.
अंतरवाली सराटीत ता. 29 रोजी विधानसभा निवडणूक लढ्याची का समोरचे पाडायचे याबाबत निर्णय घेण्यात येणार होता. परंतु, सरकार आमच्या निर्णयाची वाट पाहत होते. आमची रणनिती त्यांना कळू नये, त्यांचे डाव यशस्वी होऊ म्हणून आम्ही पण निवडणूक लांबली असल्याने ता. 29 रोजी आमचा निर्णय जाहीर करणार नाही. पुढील तारीखेनंतर जाहीर करणार आहे. आत्ताच आमची भूमिका जाहीर करून सत्ताधारी पक्षाला आम्ही संधी देणार नाही, त्यांचे डावपेच यशस्वी होऊ देणार नाही.
अंतरवाली सराटी येथे इच्छुकांची संख्या वाढली आहे. यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहेत. त्यांना काय निर्णय घ्यावा हे कळेना झाले आहे. मी बदलापूर येथील घटनेचा जाहीर निषेध करतो. कायदा व सुव्यवस्था उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बिघडवीत आहेत, त्यांना राज्य शांत राहावे असे वाटत नाही. लाठीहल्ला करण्यात येतो, असेही जरांगे म्हणाले. सरकार आरक्षण देत नाही. मराठा समाज एक झाला असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना ताकद दिसणार आहे. अंतरवाली सराटी येथील ता. 29 ची बैठक सध्या होणार नाही, ती पुढे होईल. इच्छुकांना आपले प्रस्ताव ता. 24 ऑगस्टपर्यंत दाखल करता येणार आहे. प्रस्ताव आल्यावर छाननी करण्यात येणार आहे. राज्यात प्रत्येक तालुक्यात एक बैठक घेऊन निवडणुकीबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
सरकारने राज्यात चार महिने विधानसभेची निवडणूक पुढे लांबवली आहे. सत्ताधारी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करतील, तेच परत कारभार बघतील हा सरकारचा डाव आहे. सत्ताधारींच्या विरोधात राज्यात वातावरण आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता यांना नक्की धडा शिकवणार आहे. मराठा आरक्षणाकरिता आम्हाला मैदानात यावे लागत आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.