मुंबई | नगर सह्याद्री-
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची पुन्हा गुरूवारी रात्री भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा या दोघांमध्ये बंद दाराआड तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या.
मुंबईतील धारावी पूनर्विकास प्रकल्पाला शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून विरोध केला जात आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेससह अनेक घटक पक्ष देखील अदाणी यांच्यावर सतत टीका करत असतात. या पार्श्वभूमीवर अदाणी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून अधिकृतरित्या कुठलीही माहिती दिलेली नाही.
खा. सुळे यांचे कानावर हात..
उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या भेटीवेळी खा. सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, असे सांगण्यात आले होते. मात्र या संदर्भात खा. सुळे यांना विचारले असता, मला या भेटीबाबत माहिती नाही, काल पवार साहेब खूप लोकांना भेटले आहेत, असे सांगून त्यांनी कानावर हात ठेवले.