spot_img
देशअदानी अडचणीत; अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल; काय आहे नेमके प्रकरण?

अदानी अडचणीत; अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल; काय आहे नेमके प्रकरण?

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. हिंडेनबर्ग प्रकरणात कायदेशीर बाबींना सामोरे जात असताना आता अमेरिकेच्या न्यायालयाने गौतम अदानीसह सात जणांवर अब्जावधी डॉलर्सची लाचखोरी आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

अमेरिकेच्या वकिलांनी बुधवारी सांगितले की, अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देऊ केली, असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारीच अदानींनी २० वर्षांच्या ग्रीन बाँडच्या विक्रीतून ६० कोटी डॉलर्स उभारण्याची घोषणा केली होती. पण ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार ही फंडरेजिंग योजना रद्द करण्यात आली आहे.

यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने दाखल केलेल्या खटल्यानुसार, गौतम अदानी यांच्यावर अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक आणि अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप असून गौतम अदानी आणि इतरांवर खोटी व दिशाभूल करणारी विधाने करून अमेरिकन गुंतवणूकदार तसेच जागतिक वित्तीय संस्थांकडून निधी घेतला आणि ही रक्कम लाचखोरीसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अदानींसह कोणाच्या नावाचा समावेश ?
एका आरोपानुसार, काही षड्यंत्रकर्त्यांनी गौतम अदानींना उल्लेख करण्यासाठी “न्युमेरो युनो” आणि ‘द बिग मॅन’ या सांकेतिक नावांचा वापर केला तर सागर अदानी यांनी लाचेच्या तपशीलांचा मागोवा घेण्यासाठी आपला सेलफोन वापरला होता. याप्रकरणात गौतम अदानी, सागर एस अदानी, विनीत एस. जैन, रणजीत गुप्ता, सिरिल काबेनेस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा, रुपेश अग्रवाल यांच्या नावांचा समावेश आहे.

गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यानुसार यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने दोन्ही व्यक्ती आणि सिरिल कॅबनेस या दोघांविरुद्ध संबंधित दिवाणी आरोप दाखल केले. दरम्यान, याआधी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने आरोप केले होते. मात्र अदाणी समूहाने त्यावेळी हे आरोप फेटाळून लावले होते.

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण
न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाने अदानी यांना लाचखोरी, गुंतवणूकदारांची दिशाभूल आणि फसवणुकीप्रकरणी दोषी ठरवले. या वृत्तानंतर अदानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई आणि अदानी ट्रान्समिशन या अदानींच्या बॉन्ड्समध्येही घसरण झाली आहे.

अदानींना अटक करा, राहुल गांधींची मागणी
अमेरिकेच्या सिक्योरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (SEC) अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक करणे तसेच सरकारी अधिकाऱ्यांना लाच देणे, असे आरोप गौतम अदानींवर करण्यात आले आहेत. याप्रकरणी अदानी यांचे भाचे सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे अधिकारी तसेच एज्योर पॉवर ग्लोबल लिमिटेडच्या अधिकाऱ्यांवरही आरोप लावण्यात आले आहेत. यावरुन आता अदानी समूह हा अडचणीत आला आहे. त्यातच आता या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठी मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी केली आहे. या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी अदानींसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.

“भाजप सरकार अदानींना वाचवेल”
“गौतम अदानी फसवणूक प्रकरणावर आम्ही गप्प बसणार नाही. हा मुद्दा आम्ही संसदेतही मांडणार आहोत. भाजप सरकार अदानींना वाचवेल, हेही आम्हाला माहिती आहे. अदानी यांनी २ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, तरीही त्यांना अटक केली जात नाही, असे अमेरिकन तपास संस्थेने म्हटले आहे. अदानी आताही तुरुंगाबाहेर का आहेत? त्यांना तात्काळ अटक करावी. त्यांच्यावरील आरोपांची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी”, असे राहुल गांधी म्हणाले.

“अदानी जेलमध्ये गेले तर पंतप्रधान मोदीही जातील”
“जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतमी अदानी एकत्र आहे, तोपर्यंत ते सुरक्षित आहेत. आम्हाला माहिती आहे की सरकार अदानींवर कोणतीही कारवाई करणार नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानींच्या पाठिशी आहेत. ते त्यांचे पूर्णपणे संरक्षण करत आहेत. अदानी जेलमध्ये गेले तर पंतप्रधान मोदीही जातील. भाजपचा निधी अदानीशी जोडलेला आहे”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

“अदानी भारतात रोज भ्रष्टाचार करतात”
“गौतम अदानींवर जे घोटाळ्याचे आरोप झाले आहेत, ते मी केलेले नाहीत. अदानींची चौकशी झाली पाहिजे. अदानी भारतात रोज भ्रष्टाचार करत आहेत. संपूर्ण देश अदानींच्या ताब्यात आहे”, असाही घणाघात राहुल गांधींनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात महायुतीला सर्वाधिक जागा! दोन अपक्ष बाजी मारणार

महायुती 7, मविआ 3 तर 2 अपक्ष बाजी मारणार! नगर शहरात कमालीची उत्सुकता | श्रीगोंदा,...

शिरसाटवाडी मतदान केंद्रावर काय घडलं?; काय म्हणाल्या आमदार मोनिकाताईं राजळे? वाचा सविस्तर..

पाथर्डी | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडली. आररोप प्रत्यारोप, कुठे पैशाचे...

CM पदाबाबत संजय राऊत यांचे मोठे विधान; थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : विधानसभा निडवणुकीच्या मतदानानंतर बुधवारी समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या...

विजयाचा कॉन्फिडन्स! निकालापूर्वीच आमदार जगताप यांचे झळकले बॅनर

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. जिल्ह्यातील 12 ही विधानसभा मतदारसंघात...